बांबोळीत सॅपेक टॅकरोचे दोन तज्ञ ठार
राष्ट्रीय अध्यक्षासह सॅपेक टेकरोपटूचा समावेश : टँकरच्या भीषण धडकेत रेंट अ कारचा चेंदामेंदा, टँकरचे स्टेअरिंग लॉक झाल्याने दुर्घटना
पणजी : सोमवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास बांबोळी महामार्गावर नियाझ रेस्टॉरंटजवळ कार आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. भरधाव टँकरने कारला दिलेली धडक एवढी भयानक होती की कारचा चेंदामेंदा झाला आहे. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. पंचनामा करुन टँकरचालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281 व 115 अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. ठार झालेल्या दोघांचेही मृतदेह गोमेकॉत ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि दिल्लीचे रहिवासी योगेंदर सिंग (42 वर्षे) आणि उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ सॅपेक टॅकरोपटू अंकितकुमार बालियान अशी मृतांची नावे आहेत. टँकरचालकाचे नाव राहूल सरवदे असे आहे. मयत योगेंदर सिंग हे 27 ऑक्टोबर रोजी नावेली येथे संपलेल्या 35 व्या राष्ट्रीय सॅपेक टॅकरो चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आले होते.
जीए-08-व्ही-7674 ही रेन्ट-अ-कार बांबोळीहून पणजीच्या दिशेने येत होती तर एमएच-45-एएफ- 7720 हा टँकर विरूद्ध दिशेने जात होता. नियाझ रेस्टॉरंटजवळ दोन्ही वाहने पोचली असता टँकरचालक राहूल सरवदे याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याचे दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भयानक होती की कारचा चेंदामेंदा झाला. नंतर जवळच असलेल्या झाडीमध्ये टँकर उलटला. टँकरने कारला अक्षरश: चिरडून टाकल्याने कारमधील दोघेही जागीच ठार झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह गोमेकॉत पाठविले असून टँकरचालकाला अटक केली आहे.
टँकरचालकाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनास्थळी टँकर पोचला असता स्टेअरिंग लॉक झाले आणि आपण प्रयत्न करूनही टँकर वळवता आला नाही. भरधाव टँकर रस्त्यावर दुभाजक ओलांडून कधी दुसऱ्या बाजूने जाऊन कारला धडक दिली तेच आपल्याला कळले नाही. पोलिस याबाबत तपास करीत आहेत. काल मंगळवारी दुपारी मृतांचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले. दोन्ही मृतदेहांची चिकित्सा करण्यात आली आहे. ओल्ड गोवा पोलिसस्थानकाच्या महिला उपनिरीक्षक जोस्विता नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.