लाच घेताना दोन पंटर 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
कोल्हापूर :
शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीत नाव घालण्यासाठी अडीच हजाराची लाच स्वीकारताना दोघा खाजगी पंटरना रंगेहात पकडले . सुभाष मधुकर घुणके (वय वर्षे - 34 , रा . यळगुड ता. हातकणंगले) , व शैलेंद्र महादेव डोईफोडे (वय वर्ष - 22 , रा . सणगर गल्ली , पेठ वडगाव ता . हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे असून कारवाई हातकणंगले तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात केली आहे . घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे , पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने , संदीप काशीद , पोलीस नाईक सचिन पाटील , उदय पाटील , चालक प्रशांत दावणे यांच्या सहकार्याने केली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात खाजगी पंटर सुभाष घुणके हा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो . त्याच्याकडे रेशन कार्डवरील नावे कमी -जास्त करणे . नवीन रेशन कार्ड ऑनलाइन करणे . यासह अन्य कामे कॉम्प्यूटरवर करीत होता . संबंधित तक्रारदाराने रेशन कार्ड ऑनलाइन करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत नाव समाविष्ट करावयाचे असल्याचे सांगितले . त्यानंतर संशयित आरोपी सुभाष घुणके याने चार हजार रुपये लाचेची मागणी केली . तक्रारदाराने चार हजार जास्त होतात काहीतरी कमी करा असे सांगितले . तर घुणके याने वरच्या साहेबांना पैसे द्यावे लागतात , त्यामुळे पैसे काही कमी होणार नाही असे सांगून अखेर अडीच हजारावर सौदा ठरला . संबंधित तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी आपल्या सहकार्यासह हातकणंगले तहसील कार्यालयातील पुरवठा कार्यालयात छापा टाकून लाच स्वीकारताना संशयित आरोपी घुणके व डोईफोडे यांना रंगेहात पकडले.