For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवसभरात दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग

06:43 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिवसभरात दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग
Advertisement

सौदी अरेबियाला जाताना तांत्रिक बिघाड : तर इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावरून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास दोन तासांनी विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. अन्य एका घटनेत बॉम्बची धमकी प्राप्त झाल्यामुळे इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमान अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून विमान आणि सामानाची सखोल तपासणी करण्यात आली, असे एसीपी (जी) विभाग व्ही. एन. यादव यांनी सांगितले.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबईजवळ येताच केबिन प्रेशरची समस्या निर्माण झाल्यामुळे काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. एकंदर परिस्थिती पाहता, पायलटने प्रथम मुंबई विमानतळाशी संपर्क साधून लँडिंगची परवानगी मागितली, परंतु परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर पायलटने लखनौ विमानतळाशी संपर्क साधला. लखनौकडून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर, विमान सुरक्षितपणे परतले. सुमारे 82 मिनिटांत विमान लखनौ विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. सौदी अरेबिया एअरलाइन्सचे हे विमान फ्लाइट क्रमांक एसव्ही-891 जेद्दाहला जात होते. याप्रसंगी विमानात 275 प्रवासी, चार पायलट आणि सहा क्रू मेंबर्स होते.

इंडिगोचे विमान अहमदाबादमध्ये उतरवले

अन्य एका घटनेत, कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाचे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव इंडिगो फ्लाइट क्रमांक 6ई 1232 चे शुक्रवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सकाळी 6:40 वाजता हे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळावर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. विमानात एकूण 180 प्रवासी होते. उ•ाणादरम्यान, विमान कंपनीला बॉम्बची धमकी मिळाली आणि संभाव्य धोक्यापासून बचाव करण्यासाठी आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान उतरताच सीआयएसएफ, विमानतळ पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि इतर सुरक्षा संस्था तात्काळ कारवाईस लागल्या. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

Advertisement

.