कराडमध्ये दोन पिस्तुल हस्तगत
कराड :
शहरात बेकायदा पिस्तुल वापरण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी सुरू ठेवली आहे. यात गत दोन दिवसात दोन पिस्तुल हस्तगत झाल्याची चर्चा आहे. दोन्ही पिस्तुल नेमक्या कोठून आणल्या याची चौकशी सुरू असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्वत: या गुन्ह्याचा तपास खोलवर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
कराड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या युवकांकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका ठिकाणी कराड शहर पोलिसांनी सापळा रचला होता, तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला होता. दोन्ही ठिकाणी छापा टाकल्यावर संशयितांकडे दोन पिस्तुल आढळून आल्याची चर्चा आहे. हे पिस्तुल संशयितांनी आणले कोठून? त्यांनी पिस्तुलच्या आधारे दहशत माजवली आहे का? त्यांचे साथीदार कोण आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू असल्याचे समजते. यासंदर्भात बुधवारी पोलीस अधीक्षक समीर शेख अधिकृत माहिती देणार आहेत. यानंतरच याचा उलगडा होईल.