वास्को येथे चौघा गुंडांकडून दोघांवर हल्ला
जखमीमध्ये मामा-भाचा : हल्लेखोरांवर गुन्हा नोंद
वास्को : वास्को मांगोरहिल भागात चौघा गुंडांनी दोघांना कारची धडक देऊन खाली पाडले आणि नंतर त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढवला. दोघांपैकी एकटा गंभीर जखमी आहे. दोघांनाही गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.पूर्ववैमनस्यातून मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. सुहेल शेख व इरफान मकानदार अशी जखमींची नावे असून ते मामा-भाचे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ईस्माईल शेख उर्फ कब्बू, नवाझ शेख, नवाझ व अमित गावडे या चौघांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांगोरहिल नाक्यापासून अवघ्याच अंतरावर असलेल्या फकीर गल्लीसमोरील महामार्गावर हा हल्ला झाला. बायणातील सराईत गुंड व फकीर गल्ली भागातील सुहेल शेख या युवकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वैमनस्य निर्माण झाले होते.
या वैमनस्याचा परिणाम मंगळवारी जीवघेण्या हल्ल्यात झाला. प्राप्त माहितीनुसार चौघेही गुंड मारूती कारमधून आले होते. फकीर गल्लीसमोरील महामार्गावर त्यांना हवा असलेला युवक दिसला. त्या युवकाबरोबर त्याचा मामा इरफान मकानदार होता. त्या दोघांनाही त्या गुंडांनी कारची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढवला. दोघाही जखमींना रात्री दहाच्या सुमारास गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. ज्याला त्या गुंडांनी लक्ष्य केले होते त्या युवकाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, त्याच्या नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला केल्यानंतर ते चौघेही गुंड पसार झाले.वास्को पोलिसांनी त्या गुंडांसंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले.