For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक

10:35 AM Aug 31, 2025 IST | Radhika Patil
शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक
Advertisement

देवरुख :

Advertisement

वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या देवरुख व ओझरे येथील दोन तरुणांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. या तरुणांकडील विनापरवाना बंदुक, बॅटरी, काडतुसे, दुचाकी असा एकूण 1 लाख 46 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रितेश प्रतिपाल आडाव (26, देवरुख-कांजिवरा) व साहिल संतोष कदम (19, ओझरे-बौद्धवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिषेक वेलवणकर यांनी फिर्याद दिली. देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी रात्री पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर व अभिषेक वेलवणकर हे खासगी वेशात पेट्रोलिंग करत होते. याचदरम्यान रात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास देवरुख ते सोनवडे मार्गावर दोन तरुण दुचाकीवर दिसले. एका तरुणाच्या डोक्याला बॅटरी लावलेली असल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला. कामेरकर व वेलवणकर यांनी या तरुणांना विचारणा केली असता खेकडे पकडण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

Advertisement

दुचाकीमागे बसलेल्या तरुणाची तपासणी केली असता त्याच्याकडे बंदुक व काडतुसे सापडली. यावेळी दोन्ही तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याचवेळी प्रितेश आडाव व साहिल कदम हे जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरत असल्याचे स्पष्ट झाले. याची खबर पोलीस ठाण्यात मिळताच महिला पोलीस हेडकान्स्टेबल नेत्रा कामेरकर, प्रशांत मसुरकर व सचिन पवार हे शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. प्रितेश व साहिलची चौकशी केली असता बंदुकीचा कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ 45 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची सिंगल काडतुसाची बंदुक, बॅटरी व काडतुसे व 1 लाख रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 1 लाख 46 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रितेश व साहिल यांनी संगनमताने विनापरवाना बंदुक ताब्यात बाळगून वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने आढळल्याप्रकरणी दोघांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement
Tags :

.