ट्रॉलीला धडक बसून मोटारसायकलवरील दोघेजण ठार
अंकलगी-पाच्छापूर रोडवरील घटना : अपघातास कारणीभूत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव मोटारसायकलची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या उसाच्या ट्रॉलीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघेजण ठार झाले. दि. 10 रोजी रात्री 8 च्या दरम्यान अंकलगी-पाच्छापूर रोडवरील अक्कतंगेरहाळ गावानजीक हा अपघात घडला आहे. गणेशकुमार चन्नबसाप्पा जनमट्टी (वय 45), लक्कप्पा मल्लाप्पा नाईक (वय 58, दोघेही रा. सुलदाळ, ता गोकाक) अशी त्यांची नावे आहेत.
वरील दोघेजण सोमवारी रात्री पासिंग नसलेल्या काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवरून पाच्छापूरकडून सुलदाळ गावाकडे जात होते. गणेशकुमार हा मोटारसायकल चालवत होता. तर लक्काप्पा मागे बसला होता. अंकलगी-पाच्छापूर रोडवरील अक्कतंगेरहाळ गावातील बाळाप्पा शंकर करलिंगनवर यांच्या जमिनीजवळ आले असताना स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर उसाने भरलेली ट्रॉली घेऊन रस्त्याकडेला थांबला होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने ट्रॉलीला मागून जोराची धडक दिल्याने चालक गणेशकुमार हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला लक्काप्पा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.
ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
अपघातानंतर जखमीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच अंकलगीचे पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर ट्रॉली उभे केल्याप्रकरणी एमएच 23 बीसी 4927 क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.