रेल्वेखाली महिलेसह दोघा जणांची आत्महत्या
रेल्वे पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेखाली दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली असून दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. किल्ल्याजवळ रेल्वेखाली झोकून देऊन सुमारे 55 ते 60 वर्षीय अनोळखीने आत्महत्या केली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलिसांनी अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रेल्वेखाली सापडून त्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. पाच फूट सहा इंच उंची, अंगाने सुदृढ, काळसर वर्ण असे त्याचे वर्णन आहे. त्याच्या उजव्या हातावर ॐ लिहिले आहे.
या अनोळखीने आपल्या अंगावर केसरी फुल्ल शर्ट, राखाडी हाफ पँट व लुंगी परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातात कडे व काळी रबर बँड आहे. गळ्यात रुद्राक्ष बांधलेले आहे. त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. दुसरी घटना सुळेभावीजवळ घडली आहे. सुमारे 50 ते 55 वर्षीय महिलेने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. बेळगाव रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. चार फूट आठ इंच उंची, काळसर वर्ण, अंगाने सडपातळ, गोल चेहरा असे तिचे वर्णन आहे. तिने आपल्या अंगावर पिवळी, लाल, निळी व चॉकलेटी पट्ट्या असलेली साडी व लाल ब्लाऊज परिधान केला आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी 0831-2405273 या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.