मारहाण केल्याच्या आरोपावरून सुभाषनगरच्या दोघांना अटक
बेळगाव : आठ दिवसांपूर्वी न्यायालय आवारात एका इसमाला मारहाण केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी सुभाषनगर येथील दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सुहिल रफिकअहमद इनामदार (वय 36), अरबाज अरिफ सय्यद (वय 28) दोघेही राहणार सुभाषनगर अशी त्यांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, शशीकुमार कुरळे आदींनी शनिवारी या दोघा जणांना अटक केली आहे. गेल्या सोमवार दि. 7 जुलै रोजी जुन्या कोर्ट आवारातील महाबळ कँटीनजवळ जहीरअब्बास मोदीनसाब हुक्केरी (वय 48) राहणार असद खान सोसायटी याच्यावर फरशीने हल्ला करण्यात आला होता. मारहाणीत तो जखमी झाला होता. मारहाणीनंतर त्याला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.