वाढदिवसाची पार्टी आटोपून येताना अपघातात घटप्रभाचे दोघे ठार
गोकाक-घटप्रभा मार्गावरील सिंदीकुरबेट येथील घटना
बेळगाव : आपल्या घरातच वाढदिवस साजरा झाला. पण मित्रांना धाब्यावर पार्टी देऊन परत येताना समोरून येणाऱ्या कारगाडीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे घटप्रभा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एका मित्राचा वाढदिवस घरी साजरा झाला असताना दोघा मित्रांना धाब्यावरचे जेवण देऊन परत गावी येत असताना गोकाक-घटप्रभा मार्गावरील सिंदीकुरबेट क्रॉसनजीक हा अपघात घडला.
या अपघातामध्ये श्रेयस उदय पत्तार (वय 19) व त्याच्या पाठीमागे बसलेला यल्लाप्पा आनंद कोळी (वय 19) हे दोघेही जागीच ठार झाले. तर तिसरा विनायक केंचाप्पा हादीमनी (वय 20) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यास गोकाक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमीला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. कारगाडी घटप्रभाकडून शिवापूर हल्लूर (ता. मुडलगी) कडे जात होती. दुचाकीस्वार गोकाककडून घटप्रभाकडे येत होते. मृत झालेले दोघेही आई-वडिलांना एकुलते होते.