गोवा बनावटीच्या दारू वाहतूक प्रकरणी बागलकोट जिल्ह्यातील दोघांना अटक
कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या बागलकोट जिल्ह्यातील दोघा जणांना सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून कारसह 5 लाख 12 हजार 816 रुपये किमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. हणमंत तम्माणा नायकर (वय 42), रमेश अर्जुनाप्पा मुलीमनी (वय 39) दोघेही राहणार शारदाळ, ता. जि. बागलकोट अशी त्यांची नावे आहेत. खानापूर रोडवर उद्यमबागनजीक केए 29 पी 5010 क्रमांकाची कार अडवून सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली असता कारमध्ये दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांची 77 लिटर 760 मिली गोवा बनावटीची दारू व कार जप्त केली आहे. या दोघा जणांवर उद्यमबाग पोलीस स्थानकात कर्नाटक अबकारी कायदा 1965 च्या कलम 32 व 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.