भीषण कार अपघातात दोघेजण जागीच ठार
बैलहोंगल तालुक्यातील मेकलमर्डी क्रॉसजवळ अपघात : एकजण गंभीर जखमी
बेळगाव : भरधाव स्विफ्ट डिझायर कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. रविवार दि. 10 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास बेळगाव-बागलकोट रोडवरील मेकलमर्डी क्रॉसजवळील साई धाबानजीक हा अपघात घडला आहे. सचिन यल्लाप्पा बोरिमरद (वय 21, रा. करीकट्टी, ता. बेळगाव) आणि बाळकृष्ण बसाप्पा सुळदाळ (वय 19, रा. सिद्धनहळ्ळी, ता. बेळगाव) अशी मृतांची नावे असून लक्काप्पा यल्लाप्पा बोरिमरद (वय 23, रा. करीकट्टी, ता. बेळगाव) असे जखमीचे नाव आहे. अपघाताची नोंद नेसरगी पोलीस स्थानकात झाली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, वरील तिघेजण औषध आणण्यासाठी सौंदत्ती तालुक्यातील गोविंदकोळ गावाला स्विफ्ट डिझायर कारमधून गेले होते. औषध घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे येण्यासाठी बेळगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले. बेळगाव-बागलकोट रोडवरून येत असताना सोमनट्टी ते मेकलमर्डी क्रॉसदरम्यानच्या साईधाबाजवळ आल्यानंतर भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तसेच कारचाही अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सचिन हा कार चालवत होता. तर बाळकृष्ण आणि लक्काप्पा हे सहप्रवासी होते. लक्काप्पाला बेळगाव येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच नेसरगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.