तळावली, कुर्टी येथे दोन अपघातात दोन पादचारी गंभीर जखमी
प्रतिनिधी/ फोंडा
नववर्षारंभात वाहतूक खात्याने दुचाकीसाठी दोन हेल्मेट बाळगणे जरूरी केले खरे मात्र सुसाट, बेदरकार हाकणाऱ्या आलिशान कारवाल्यांना आवरणार कोण? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोघा पादचाऱ्यांना आलिशान कारने ठोकरल्याच्या घटना नोंद झालेल्या आहेत. कुर्टी येथील अपघातात मंगलदास सतरकर (46, रायत-कुर्टी) तर वाडी तळावली येथे अपघातात अक्षता गावकर (30, वाडी-तळावली) असे दोन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरवाडा कुर्टी येथे झालेल्या अपघातात फर्मागुडीहून खांडेपार बाजूने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मंगलदास सतरकर हा पादचारी जखमी झाला. रस्त्याच्या कडेने चालत जात असताना मागून आलेल्या वाहनाने ठोकरले. यावेळी रस्त्यावर फेकला गेलेल्या जखमी मंगलदास याला त्याच स्थितीत टाकून कारने घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटनेची हीट अॅन्ड रन म्हणून नोंद केली असून फोंडा पोलिस संशयिताच्या मागावर आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तळावली येथे पादचारी महिलेला ठोकरले
अन्य एका अपघातात शुक्रवार 2 रोजी सायंकाळी 6.30 वा. सुमारास भिंगीवाडा तळावली येथे रस्त्याच्या कडेने चालत असताना अक्षता गावकर या महिलेला जीए 07 एन 4882 या क्रमांकाच्या आलिशान कारने जोरदार ठोकर दिली. अपघातानंतर घटनास्थळावर पोबारा करणाऱ्या चालकाला येथील स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही अपघातातील जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित सतीश शेट तळावलीकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 281, 125 (ए) कलमाखाली गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे.