जीबीएसमुळे दोन रूग्णांचा मिरज सिव्हीलमध्ये मृत्यू
सांगली/मिरज :
जीबीएस या आजारामुळे मिरज सिव्हिलमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणा हादरली असून ती तात्काळ अलर्ट मोडवर आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान ज्या दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे ते दोन्ही रूग्ण सांगली जिल्हयाबाहेरील आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिरजेतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांमध्ये हुक्केरी (जि. बेळगाव) येथील १४ वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील ६५ वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे. कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील आहे. दरम्यान, जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या नऊ वर पोहोचल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील १२ रुग्णांबर उपचार सुरू होते. यापैकी सहा रुग्ण बरे झाले. सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. १२ रुग्णांमध्ये सांगली शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये 'जीबीएस'चे रुग्ण आढळले होते. कर्नाटकातील हुक्केरी येथील १४ वर्षांच्या तरुणाला 'जीबीएस'ची लागण झाली होती. त्याला ३१ जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. गुरव यांनी केले
- जीबीएस हा बरा होणारा आजार
जीबीएस हा बरा होणारा आजार आहे. या आजारामुळे कोणीही घाबरून संसर्गजन्य जावू नये. तसेच यावर उपचारही आहेत. हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे कोणीही याबद्दल गैरसमज करू नये, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केले आहे.