उधमपूरमध्ये 2 पाकिस्तानी दहशतवादी ठार
चकमकीनंतर शस्त्रास्त्रेही जप्त : ‘ऑपरेशन किया’ अंतर्गत सुरक्षा दलाची मोठी कारवाई
जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक आणि अतिरेकी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जैश ए मोहम्मदचा कमांडर रुबानि उर्फ अबू माविया याचा खात्मा झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षापासून या भागामध्ये तो सक्रीयपणे राहत आपली दहशत पसरवित होता, अशी ही माहिती समोर येते आहे.
बसंतगड क्षेत्रामध्ये ‘ऑपरेशन किया’ अंतर्गत भारतीय सेनेने मंगळवारी रात्री ही कारवाई केली असल्याचे समजते. भारतीय सेना आणि सुरक्षा दलांना सदरच्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारेच भारतीय सेनेने सुरक्षा दलासोबत कारवाई केली असता त्यामध्ये दोन जणांचा खात्मा करण्यात आला.
सीआरपीएफ, व्हाईट नाईट कोर, जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. जवळपास 20 मिनीटे ही कारवाई चालली होती. रामनगर, बसंतगड आणि बिलावरच्या जंगलामध्ये अतिरेकी असल्याची शंका सुरक्षा दलाला आली होती. या संशयाच्या पार्श्वभूमीवर संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. यापूर्वी 31 जानेवारी रोजी किस्तवाडच्या जंगलामध्ये अशीच कारवाई सुरक्षा दलाने संयुक्तपणे केली होती. त्यामध्ये तीन जवान जखमी झाले होते आणि एक दहशतवादी जखमी झाला होता.