ड्रग्ज विकत घेणाऱ्या मुंबईच्या दोघांना अटक
सांगली :
विटा येथील एमडी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पुन्हा एकदा वेगाने सुरू केला आहे. हे ड्रग्ज तयार झाल्यानंतर विकत घेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताची नावे मोहमंद कय्यूम अकबर अली शेख (36 रा. कुर्ला कमान, काजू पाडा, रूम नंबर नऊ आझाद चाळ मुंबई) आणि मोहमंद ईस्माईल सलीम खान (45 रा. कलिना डोंगर, रूम नंबर सहा शेडी हाजी चाळ नूरी मस्जिदच्या समोर सांताव्रुझ पूर्व मुंबई) अशी आहेत. या दोघांना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या नऊ झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विटा येथील कार्वे एमआयडीसीमध्ये मेफॉड्रॉन एम.डी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना काही दिवसापुर्वीच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून उध्दवस्त करण्यात आला होता. यामध्ये हा कारखाना सुरू करणाऱ्या रहुदीप धानजी बोरीचा (रा. सुरत, सुलेमान शेख रा. बांद्रा, मुंबई), बलराज कातारी (रा. साळशिंगे विटा), जितेंद्र परमार (रा. अलिबाग, मुंबई), अब्दुलरजाक शेख (रा. पवई, मुंबई, सरदार पाटील रा शेणे, ता. वाळवा) यांना अटक केली होती. ज्या जागेत हा कारखाना सुरू केला होता त्या जागेच्या मालकीण सौ. गोकुळा विठ्ठल पाटील (रा. भवानी मळा, पाटील वस्ती, विटा) यांना अटक केली होती.
याप्रकरणाचा अधिक तपास करताना हे ड्रग्ज निर्माण झाल्यानंतर त्याची विक्री कोठे करायची याची माहिती काढण्यात आली. हे ड्रग्ज मुंबईतील दोघांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करत होते. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला हे दोघेजण गुंगारा देत होते. पण मुंबईतील वाकोला भागातून त्यांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, इम्रान मुल्या, नागरेश कांबळे, अमर नरळे, सतीश माने, महादेव नागणे, संदीप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत यांनी पार पाडली.