आणखी दोन नक्षलींचा छत्तीसगडमध्ये खात्मा
दोन दिवसात 9 नक्षलवाद्यांना केले ठार
वृत्तसंस्था/ विजापूर
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दोघांचे मृतदेह जंगलभागातून बाहेर काढण्यात आले आहेत. सलग चार दिवसांपासून जंगलभागात शोधमोहीम सुरू केल्यापासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. यापूर्वी गुरुवारी अबुझमदच्या रेकावाया भागात सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांचे मृतदेहही सापडल्याची माहिती बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिली. या 7 नक्षलवाद्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुष आहेत.
विजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी चकमक झाली. नेंद्रा जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विजापूर येथून एसटीएफ आणि सीआरपीएफ जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी सैनिक जंगल परिसरात पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
बुधवारपासून तपास यंत्रणांकडून सुरू केलेल्या कारवाईमध्ये हजारहून अधिक जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले होते. यामध्ये नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफ संघांचा समावेश आहे.