झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आणखी दोघांना अटक
निलंबित सुरक्षा अधिकाऱ्यांची कसून चौकशी
वृत्तसंस्था/गुवाहाटी
आसाममधील प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाने शुक्रवारी त्यांच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (पीएसओ) अटक केली. दीर्घकाळ सुरक्षा अधिकारी असलेले नंदेश्वर बोरा आणि परेश वैश्य यांना एसआयटीने ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत गर्ग यांच्या बँक खात्यातून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. यापैकी 70 लाख रुपये बोराच्या खात्यात आणि 40 लाख रुपये वैश्य यांच्या खात्यात जमा झाले. दोन्ही अधिकाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते.
गायकाच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये झुबीनचा चुलत भाऊ आणि डीएसपी संदीपन गर्ग, व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, सह-गायक अमृतप्रभा महंत, ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत आणि बँडचे ड्रम मास्टर शेखर ज्योती गोस्वामी यांचा समावेश आहे. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त होत असल्याने आसाम सरकारने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरू केली आहे.