पीर्ण येथील खूनप्रकरणी आणखी दोघे गजाआड
संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी
पणजी : पीर्ण येथे झालेल्या कपिल चौधरी (19 वर्षे, उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयिताला अवघ्या 15 तासात अटक केल्यानंतर सोमवारी आणखी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये डायसन आग्नेलो कुतिन्हो (31 वर्षे, कळंगुट), सुरज ज्योतीशी ठाकूर (21 वर्षे, कांदोळी) यांचा समावेश आहे. यापूर्वी मुख्य संशयित गुऊदत्त सुभाष लवंदे (31, कांदोळी) याला अटक करण्यात आली आहे.
कार चोरण्याच्या प्रयत्नामुळे खून
बनावट ओळखपत्र देऊन भाड्याने घेतलेली थार गाडी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून कपिल चौधरी याचा खून झाला आहे. कपिल चौधरी याने 30 ऑक्टोबर 2025 रोजी संशयित गुऊदत सुभाष लवंदे याच्या मालकीची जीए-03-5254 क्रमांकाची थार कार कांदोळी येथून भाड्याने घेतली होती.
कारने ओलांडली गोवा सीमा
ही कार दीपक ठाकूर नावाचे बनावट ओळखपत्र देऊन भाड्याने घेतली होती. त्या दिवशी संशयित गुऊदत लवंदे याला सदर थार कार गोवा सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे ट्रॅकरद्वारे (जीपीएस) आढळून आले होते. त्यामुळे संशयित त्याच्या मित्रांसह त्याच्या थार कारचा पाठलाग करण्यासाठी आणि शाध करण्यासाठी त्याच्या केआयए सेल्टोस कार क्रमांक जीए- 06- एप- 2937 मध्ये निघाले.
कणकवलीत सापडली कार व कपिल
शोधात निघालेल्या लवंदे व त्याच्या मित्रांना कणकवली-महाराष्ट्र येथे कपिल चौधरी याच्यासह थार कारचा शोध लागला. त्यांनी कपिल चौधरी याच्यासोबत थार कार थिवी येथे आणली. संशयितांनी कपिलवर लाथा आणि लाकडी दांड्याने हल्ला केला. पुढे रात्री 12 वाजता त्यांनी त्याला जखमी अवस्थेत थिवीच्या डोंगराळ भागात सोडले. त्यानंतर संशयितांनी थिवी येथे वाईन शॉपमधून दारूची बाटली खरेदी केली आणि रिकामी बाटली त्याच्या पँटच्या खिशात ठेवली, जेणेकरून तो दारू पिऊन पडला आहे, असे लोकांना भासावे. मात्र पोलिसांनी खऱ्या प्रकाराचा पर्दाफाश करून मुख्य संशयितांना अटक केली. कोलवाळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.