रेल्वे स्टेशनवर होणार आणखी दोन एक्सलेटर अन् दोन लिप्ट
कोल्हापूर / विनोद सावंत :
शाहूपुरी भाजी मार्केट येथून रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी सध्या एस्कलेटर (सरकता जिना) आहे. याबरोबरच आता रेल्वे स्टेशनवर आणखीन दोन एस्कलेटर आणि दोन लिप्ट बसविल्या जाणार आहेत. तिकीट कक्ष येथील मुख्य प्रवेशातून आत आल्यानंतर लगतच असणाऱ्या पादचारी पुलाच्या जागी नव्याने पादचारी पुल उभारला जात आहे. या ठिकाणी हे दोन एस्कलेटर, दोन लिफ्ट होत आहेत. यामुळे बॅगा हातात घेऊन जिन्यावरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धापा टाकत जाण्याचा त्रास आता संपणार आहे.
कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये एक नंबर प्लॅटफॉर्म आणि दोन नंबर प्लॅटफॉर्मसाठी पादचारी पुलाच्या आवश्यकता नाही. परंतू एक नंबर आणि दोननंबर प्लॅट फॉर्मवरून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी येथील पादचारी पूलावरून जावे लागते. नव्याने झालेल्या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर नवीन बुकींग कक्षच्या इमारतीजवळून जावे लागते. कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सध्या दोन पादचारी पूल आहेत. यापैकी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला लगतच असणारा पादचारी पुलाची मुदत संपली आहे. तसेच हा पुल अपुराही पडत आहे. हा पुल पाडून नव्याने पुल उभारणे गरजेचे होते. त्यामुळे अमृत योजनेतून रेल्वे स्टेशन येथील अंतर्गत कामासाठी 16 कोटी मंजूर झाले असून त्यापैकी सुमारे 10 कोटींमध्ये येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन पादचारी पुल उभारला जात आहे. त्याचे कामही गतीने सुरू आहे. संबंधित कंपनीला आठ महिन्यांची मुदत आहे. या ठिकाणी रेल्वे सतत जात असल्याने नवीन पुलाचे काम करण्यासाठी अवधी कमी मिळत आहे. तरीही पुढील सहा महिन्यांत नवीन पुल पूर्ण करणार असल्याचा दावा ठेकेदार कंपनीने केला आहे. या पुलामुळे चारही प्लॅटफॉर्मावर प्रवाशांना जाणे शक्य होणार आहे. नवीन पूल होताच जुना पूल पाडण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्मचे नंबर बदलणार
रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असणाऱ्या बाजूलाच नव्याने 4 नंबरचा प्लॅटफॉर्म झाला आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी नवीन बुकींग इमारत आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानापासून प्रवेश आहे. रेल्वे स्टेशनवर आलेले काही प्रवाशी रेल्वे रूळावरून धोकादायकरित्या चार नंबर प्लॅटवर जातात. नवीन पादचारी पुलाची उभारणीनंतर चारही प्लॅटफॉर्मावर जात येणार आहे. सध्याचे प्लॅटफॉर्म नंबर सलग नाहीत. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबरही बदलण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे.
रेल्वे स्टेशन होणार हायटेक
कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये केंद्राच्या अमृत भारत योजनेतून मिळालेल्या 43 कोटींच्या निधीतून विविध विकासकामे केली जात आहेत. प्रशस्त तिकीट कक्ष करण्यात येत आहे. त्यालगतच स्वच्छतगृहांची उभारणी केली जात आहे. याचबरोबर नवीन पादाचारी पुलाच्या ठिकाणी जिन्यासोबत दोन एक्सलेटर आणि दोन लिप्ट असणार आहेत. यामुळे रेल्वे स्टेशन हायटेक होण्याच्या मार्गावर आहे.
नवीन पुलाच्या कामावर वॉच
मुंबईतील पादचारी पुल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नवीन पादचारी पुल उभारताना नियमावलीमध्येही बदल केले आहेत. याचमुळे कोल्हापूर स्टेशनवर होत असलेला नवीन पादचारी पुलाच्या कामावर पुणे विभागीय रेल्वे प्रशासन, प्रजोक्ट मॅनेजरसह 10 विविध विभागातील अधिकाऱ्यांचा वॉच आहे. वेळच्यावेळी त्यांच्याकडून कामाची तपासणी केली जात आहे. स्टील, सिमेंट काँक्रीटचा दर्जाही तपासला जात आहे.
जुना पादचारी पुल मुळातच अपुरा पडत होता. त्यामुळे नवीन पादचारी पुल उभारण्याचा निर्णय चांगला आहे. हा पुल प्रवाशांच्या सोयीचा ठरणार आहे. परंतू काम त्वरीत पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच हा पूल शाहूपुरी तालमीपर्यंत केल्यास प्रवाशांना त्याबाजुलाही सहज जाणे शक्य होईल. रेल्वे प्रशासनाने याचाही विचार करणे आवश्यक आहे.
शिवानाथ बियाणी, सदस्य पुणे रेल्वे प्रवासी संघटना