दोन महिन्यांचे रेशन मिळणार याच महिन्यात
मात्र दोनवेळा बायोमेट्रिक देणे बंधनकारक : रेशनदुकानदारांची वाढणार डोकेदुखी
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
मागील वेळीप्रमाणे यावेळीही रेशनकार्डधारकांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यातील केंद्र सरकारच्या कोट्यातील जोंधळा आणि तांदूळ ऑगस्ट महिन्यातच मिळणार आहे. मात्र यासाठी दोनवेळा बायोमेट्रिक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या ई-केवायसीचे काम सुरू असतानाच त्यातच पुन्हा दोनवेळा बायोमेट्रिक घ्यावे लागणार असल्याने रेशनदुकानदारांवर कामाचा ताण पडणार आहे.
अंत्योदय रेशनकार्डला ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचा मिळून 42 किलो जेंधळा आणि 28 किलो तांदूळ दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कोट्यातील बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रतिमानसी 6 किलो जोंधळा तर 4 किलो तांदूळ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या कोट्यातील बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रतिमानसी केवळ 10 किलो तांदूळच मिळणार आहे. यापूर्वी जून आणि जुलै महिन्यात राज्य सरकारच्या कोट्यातील रेशनचे वितरण करण्यात आले होते. तत्पूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात केंद्र सरकारच्या कोट्यातील रेशनचे वितरण करण्यात आले होते. दरवेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यातील रेशनचे वितरण केले जात होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकारकडून आपल्या कोट्यातील रेशन एकाचवेळी पाठविले जात आहे.
यापूर्वी केवळ तांदळाचे वितरण केले जात होते. पण गत महिन्यापासून तांदळाबरोबरच जोंधळ्याचेदेखील वाटप केले जात आहे. सदर जोंधळा केंद्र सरकारकडून पुरविला जात आहे. 5 वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या रेशनकार्डवरील सदस्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात आहे. यासाठी बराच विलंब होत आहे. मोठ्या प्रमाणात ई-केवायसी करण्याचे काम बाकी आहे. रेशन वितरण करण्याबरोबरच ई-केवायसीदेखील करावी लागत आहे. अनेकवेळा सर्व्हर समस्या उद्भवत असल्याने रेशनदुकानदारांसह रेशनकार्डधारकांनाही ताटकळत थांबावे लागत आहे.
काही रेशनदुकानदारांकडून ई-केवायसी करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पण केवायसीसाठी कोणीही पैसे देऊ नयेत, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून केले जात आहे. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यातील प्रत्येकी 5 किलो याप्रमाणे 10 किलो तांदूळ दिला जात होता. तर अंत्योदय रेशनकार्डला 75 किलो तांदूळ देण्यात येत होता. मागच्या वेळीप्रमाणे यावेळीदेखील केंद्र सरकारने आपल्या कोट्यातील रेशन ऑगस्ट महिन्यातच पुरविले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील रेशनचे याच महिन्यात वितरण केले जाणार आहे. पण यासाठी दोनवेळा बायोमेट्रिक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागच्यावेळी रेशनदुकानदारांकडून दोनवेळा बायोमेट्रिकला विरोध करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एकाचवेळी बायोमेट्रिक घेण्याचा आदेश जारी केला होता. यावेळी जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार हे मात्र पहावे लागणार आहे.