विद्युत भारीत तारेचा शॉक लागून माजगावातील दोन दुभत्या म्हशी ठार
चिपटेवाडी नजिक इन्सुली क्षेत्रफळ वाडीतील घटना
ओटवणे प्रतिनिधी
विज वाहिनीच्या जमिनीवर पडलेल्या विद्युत भारीत तारेचा शॉक लागून माजगाव चिपटेवाडी येथील दोन दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्याची घटना इन्सुली क्षेत्रफळ वाडीत सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने या म्हशींचे मालक बचावले. मात्र या घटनेत त्यांचे सुमारे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले. विज वाहिनी जीर्ण झाल्यामुळेच ही घटना घडली असुन यात या दोन मुक्या जनावरांचा दुर्दैवी जीव गेला. माजगाव चिपटेवाडी येथील गोविंद बापू चौगुले हे सोमवारी सकाळीच आपल्या म्हशी घेऊन चरायला गेले होते. या म्हशी चरता चरता इन्सुली क्षेत्रफळ वाडीत गेल्या. या दरम्यान जीर्ण झालेली विज वाहिनी जमिनीवर तुटून पडल्यामुळे या विद्युत भारीत तारेचा स्पर्श होऊन दोन म्हशी जागीच ठार झाल्या. या तडफडणाऱ्या म्हशींना वाचवण्यासाठी गोविंद चौगुले पुढे सरावले. मात्र जमीन ओली असल्यामुळे त्यांनाही या विद्युत भारित जमिनीचा धक्का बसला. आणि हा विजेचा शॉक असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या जागेतून काढता पाय घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ घडला. या धक्क्यातून सावरत गोविंद चौगुले यांनी या घटनेची माहिती भाई देऊलकर यांना दिली. त्यांनी तात्काळ वायरमनला कळविल्यानंतर त्वरीत विज पुरवठा खंडीत कऱण्यात आला. त्यानंतर घटनास्थळी माजगावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू गावडे, महसूल, पोलीस, विज वितरण, पशु वैद्यकीय खात्याचे अधिकारी यांनी भेट दिली.