दोन कमी शंभर!
दिल्लीच्या विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अत्यंत थाटात उद्घाटन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी लोकभाषेत या संमेलनाचे वर्णन दोन कमी शंभर असे केले आहे. 147 वर्षांची आणि 97 समारंभांची परंपरा असलेले हे संमेलन दुसऱ्यांदा राजधानी दिल्लीत तेही 70 वर्षांच्या अंतराने होत आहे. त्याची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली तेव्हा महाराष्ट्राचे डोळे तिकडे लागून राहिले होते. रविवारपर्यंत येथे मराठी भाषेचा गजर होईल. हे करत असताना मराठीला नुकताच मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या समारंभाची शोभा आणि उत्साह वाढवणारा ठरलेला आहे. दिल्लीवर मराठ्यांचा जरीपटका फडकवण्यासाठी ज्या मैदानावर मराठा लष्कराचे तळ शिंदे आणि होळकर यांच्या सहभागाने दाखल झाले होते त्याच तळावर असलेल्या तालकटोरा स्टेडियममध्ये मराठीचे हे संमेलन होत आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यामध्ये ऐनवेळी येणारे अडथळे आणि नियोजनातील गडबड यांचा विचार करण्याची किंवा नको ती कुरापत उकरून काढण्याची ही वेळ नाही तर त्याचा आनंद घेतानाच मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांच्या समोर उभ्या असलेल्या आव्हानाची आणि थोरवीची चर्चा होणे आणि पुढे जाण्यासाठी विचाराची एक दिशा मिळणे अपेक्षित आहे. एकीकडे मराठी प्राथमिक शिक्षणातून हद्दपार होते की काय याची चिंता खूप मोठा वर्ग प्रदीर्घ काळ करत आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच झाले पाहिजे असे मान्यवर सांगत असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढतच चालली आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या 12 कोटी पेक्षाही अधिक असली तरीही अनेकांच्या बोलीतून मराठी हद्दपार होऊ लागली आहे. मराठी संवादात हिंदी किंवा इंग्रजी प्रतिशब्द सहज व्यवहारात देखील उच्चारले जात आहेत. म्हणजेच अनेकांच्या बोलीत भेळमिसळ झाल्याचे दिसत आहे. अशा काळात होणारे हे संमेलन कशी दिशा देणार? हे पाहणे औत्सुक्याचे असेल. आपल्या पहिल्याच भाषणात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अनुभवी शब्दांची फुंकर घालून मराठी मनावर साचलेली राख हटवण्याचा प्रयत्न केला. तोही अगदी बेमालूमपणे. आपण काही उपाय सांगत आहोत अशा थाटात न बोलता आपल्या अनुभवी आणि ओघवत्या शैलीत त्यांनी संवाद साधला आणि दिशादर्शन देखील केले. मंचावरील मान्यवर मंडळींच्या गर्दीत अध्यक्षांचे भाषण झाकोळून जाईल अशी शंका पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली होती आणि आपणच आपणास झाकोळून टाकायचे की नाही हे अध्यक्ष म्हणून भवाळकर यांनाच ठरवायचे आहे असे अनेकांनी मत व्यक्त केले होते. प्रत्यक्षात पहिल्या उद्घाटन समारंभात मिळालेल्या वेळेत भवाळकर यांचे पंतप्रधानांच्या उपस्थितीत जे उत्स्फूर्त भाषण झाले ते एका ओवी प्रमाणेच थोरवी गाणारे, व्यथा मांडणारे आणि दिशा देणारे ठरले. अध्यक्षांना किती वेळ मिळाला यापेक्षा त्यांनी मिळालेल्या वेळेत काय साधले? हे महत्त्वाचे आहे. या संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना देण्यात आलेल्या विठ्ठल रखुमाईच्या चित्राचा उल्लेख करुन अध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी विठ्ठल हा इथल्या संस्कृतीचा समन्वय कसा आहे याची अत्यंत समर्पक अशी उजळणी संपूर्ण सारस्वत विश्वाला करून दिली. महाराष्ट्राबाहेर चाललेल्या मराठीच्या या महासंमेलनाच्यावेळीच खुद्द महाराष्ट्रात समाज जाती जातींमध्ये विभागण्याचे संकट असताना या भूमीची जडणघडण कशी झाली त्याची आठवण महाराष्ट्राला करून दिली. विठ्ठल रखुमाई हे इथल्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे या विठ्ठलाला भेटायला केवळ महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगणा अशा दूरच्या प्रदेशातून लोक येतात हा विठ्ठल काळा सावळा, गोऱ्या रंगाची हौस नसलेला म्हणून इथल्या सर्व जाती जमाती त्याच्या पायाशी जातात असे सांगितले. संतांनी आपल्या विचारांनी शिवरायांसाठी भूमी निर्माण केली या महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांचीही उजळणीही केली. साहित्य संमेलन असे याला अभिजात भाषेत म्हटले जात असले तरी वास्तवात ते बोलींचे संमेलन आहे. बोली कोणाचाही दुस्वास करत नाहीत. याच बोली भाषेत महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचे स्मरण करायला लावून संतांनी ही भाषा जिवंत ठेवली. अंत्यजांनाही आपले मानणारा विचार यातून आला. भले त्याला आधुनिक विचार म्हटले जाते. पण, तो विचार मराठी लोकसंस्कृतीत त्याहीपेक्षा खूप आधीपासून होता. इथल्या अंत्यज स्त्रियाही संतसाहित्यातून बोलत्या होत होत्या. मराठी संतांनी पुरोगामीपणे जात, पात, पक्ष, पंथ भेदाच्या पलीकडे जपले. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते, ती जोडणारी हवी, तोडणारी नाही. असे विचार त्यांनी देशासमोर ठेवले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा समारंभ भावनिक देखील होता. एक तर दिल्ली हे त्याचे एक कारण. त्यात यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्राr जोशी यांच्याकडे, स्वागताध्यक्षपद काकासाहेब गाडगीळ यांच्याकडे व उद्घाटनाला पंतप्रधान पंडित नेहरू यांची उपस्थिती होती. यंदाच्या संमेलनाला एक गुणवंत स्त्राr अध्यक्षपदी, ज्येष्ठ नेते शरद पवार स्वागताध्यक्षपदी आणि पंतप्रधान मोदी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. मोदी यांनी मातृभाषेतून शिक्षणाच्या भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे या निमित्ताने गुणवर्णन केले. त्यासाठी केशवसुतांच्या जुने जाऊ द्या मरणालागुनी... या काव्यपंक्तींचा अत्यंत चपखलपणे आणि राजकीय हेतूही साध्य केला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशे वर्षे, अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती, संविधानाचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष, त्यात अभिजाततेचा मिळालेला दर्जा या सर्वाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संघाच्या कार्यामुळे आपण मराठी भाषा चांगल्या पद्धतीने जपू शकलो व अभिजात दर्जा देण्याच्या कामात आपला सहभाग लाभला हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणात मराठी माणसाची या दिल्लीला काबीज करण्याची इच्छा यांचा उल्लेख करतानाच मराठी साहित्याचा संत साहित्य पासून पुरोगामी, दलित साहित्यापर्यंतचा प्रवास आपल्या ओघवत्या शैलीत मांडून संमेलन सर्वसमावेशी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. दोन कमी असले तरी शंभर होण्याकडे सुरू असलेली ही वाटचाल योग्य दिशेने आणि गतीने झाली तर मराठी ज्ञान भाषा होण्याचे स्वप्न आणि बोली भाषा म्हणून ती मराठी माणसांच्या जिभेवर सदैव वास करण्याची आस पूर्ण होईल. त्यादिशेने हे संमेलन जावे.