दोन बिबटे मृतावस्थेत, एकाला जीवदान
रत्नागिरी :
जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांचा संचार वाढला असून लांजा तालुक्यात वाकेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला तर संगमेश्वरात असुर्डे येथे बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. तिसऱ्या घटनेत रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.
लांजा प्रतिनिधी कळवतो, तालुक्यातील वाकेड लक्ष्मीबाग येथे 23 रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने नर बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातात बिबट्याचा जबडा तुटला असून डोके, मान आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. लांजा वनपाल सारीक फकीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिबट्या अंदाजे दीड वर्षांचा होता. मृत बिबट्याचे भांबेड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या नियमांनुसार त्याचे दहन करण्यात आले.
- असुर्डेत मृत पिल्लाजवळ मादी बिबट्याचा वावर
संगमेश्वर वार्ताहर कळवतो की, सकाळी असुर्डे येथे राहुल जाधव यांना रस्त्याच्या कडेला बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. त्याचवेळी जवळच मादी बिबट्या बसलेली दिसली. याबाबत त्यांनी राकेश जाधव यांना माहिती दिली. राकेश जाधव यांनी तात्काळ पोलीस पाटील सुभाष गुरव यांना कल्पना दिली. नंतर सुभाष गुरव, राकेश जाधव आणि इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मात्र मादी बिबट्या पिल्लाजवळ वावरत असल्याने कोणालाही जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. तातडीने वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मादी बिबट्या काही वेळाने जंगलात पळून गेली. यानंतर मृत पिल्लाला ताब्यात घेण्यात आले. पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहावर वनविभागाच्या देखरेखीखाली अंतिम संस्कार करण्यात आले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. गावकरी अजूनही घाबरलेल्या अवस्थेत असून, वनविभागाकडून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.