दोन लाख नोकऱ्या उपलब्ध
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : कौशल्यप्राप्त बेरोजगार युवकांना संधी
पणजी : राज्यातील आणि केंद्रातील डबल इंजिन सरकार हे केवळ आणि केवळ जनकल्याणासाठी काम करीत आहे. त्यामुळे कोणी जर नोकऱ्यांच्या निर्मितीबाबत चिंता करीत असेल तर त्यांना ‘भिवपाची गरज ना’. कारण राज्यातील पर्यटन, फार्मसी, आयटी व उद्योगक्षेत्रात सुमारे 2 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, अशी माहिती देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला आणि बेरोजगार युवकांना दिलासा दिला आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून समग्र शिक्षा अभियान आणि शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीत आयोजित ‘भ्रमण’ कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नोकऱ्यांच्या निर्मितीबाबतचा मुद्दा उपस्थित करून राज्यात नोकऱ्या उपलब्ध आहेत, परंतु त्या त्या पदाप्रमाणे आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. काही काळापूर्वी खाण उद्योग हा गोव्याचा मुख्य व्यवसाय होता. परंतु आता या व्यवसायाची जागा पर्यटन उद्योगाने घेतली आहे. पर्यटन उद्योगात नोकऱ्या मिळविण्याची बरीच संधी आहे. त्यासाठी सरकारने आयटी तसेच इतर संस्थांमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि इतर संबंधीत अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. ताज हॉटेलासारख्या ठिकाणी गोमंतकीय नोकरीसाठी जाण्याबरोबरच उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारू शकतात. ही गोष्ट प्रत्येक तऊणांना प्रोत्साहन देण्यासारखी आहे. दहावी, पदवीधर व इतर कौशल्यप्राप्त शिक्षण घेतलेले युवकही मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या करू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्याचे पर्यटन आता किनाऱ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. पर्यटन ध्यानधारणा करण्यासाठी देश-विदेशातील नागरिक गोव्यात येत आहेत त्यामुळे अध्यात्मिक पर्यटनही सुरू झालेले आहे. धारगळ येथील आयुष इस्पितळातही उपचार घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यातून वैद्यकीय पर्यटन सुरू झालेले आहे. पर्यटन गाईड हा व्यवसाय आता वाढतच आहे. या सर्व गोष्टी आता नोकऱ्या निर्मितीसाठीच करण्यात आलेल्या आहेत. याकडे युवकांनी लक्ष देऊन त्या त्या प्रमाणे शिक्षण घेतल्यास नोकऱ्या नक्कीच मिळणार आहेत. बाहेरील किंवा परराज्यातील युवकांना या ठिकाणी संधी न देता प्रथम गोमंतकीयांना संधी उपलब्ध आहेत. त्याचा विचार करावा, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
मंत्री राणे यांच्या वक्तव्याची कात्रणे दिल्लीत
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सरकारसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करून वेगळा विचार करण्याचे दिलेले संकेत आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. कारण पक्षाच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मंत्री राणे यांची वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली वक्तव्यांची कात्रणे दिल्लीतील भाजप नेत्यांना पाठवून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पक्षहितासाठीच बोललो : विश्वजित
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारला रोजगार प्रश्नावरून जे ललकारले होते, त्या संदर्भात प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणे यांनी आपण पक्षासाठी अथक काम करीत आहे. भावनेच्या भरात काही शब्द आपण बोललो. परंतु सर्व काही पक्षहिताच्या दृष्टिकोनातूनच बोललो, असे स्पष्ट केले आहे. भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल गुरुवारी सायंकाळी राणे यांच्याशी चर्चा केली. सत्तरीमध्ये आपण हे निवेदन कशासाठी केले? असे विचारले असता राणे यांनी आपले उद्दिष्ट सरकारला ‘टार्गेट’ करण्याचे नाही.
उपस्थित नागरिकांना आमचे तुमच्यावर लक्ष आहे आणि तुम्हाला रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे, त्यासाठी आपण कोणतीही कडक भूमिका घेऊ शकतो हे त्यांना पटवून देण्यासाठीच ते विधान केले होते, असे राणेंनी तानावडे यांना सांगितले. आपण सत्तरीमध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची नोंदणी करत असून त्या दृष्टिकोनातून आपण पावले उचलीत आहे, असेही राणेंनी स्पष्ट केल्याचे तानावडे म्हणाले. विश्वजित राणे हे भाजपबरोबरच राहणार आणि भाजपकडूनच गोव्याचा विकास ते करतील, करीत आहेत. रोजगारप्रश्नी त्यांनी भावनिक होऊन केलेले निवेदन हे सरकार व पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच केलेले आहे. राणे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांच्याशीही चर्चा करुन आपला खुलासा केलेला आहे. त्यामुळे या विषयावर आता पूर्णत: पडदा पडला असल्याचे तानावडे म्हणाले.