पॅराग्लायडिंग कोसळून दोन ठार
केरी किनाऱ्यावरील घटना, महिला पर्यटकासह पायलटचा गेला बळी
प्रतिनिधी/ पेडणे, हरमल
केरी किनाऱ्यावर पॅराग्लायडिंग कोसळून महिला पर्यटकासह पायलट ठार झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दि. 18 रोजी संध्याकाळी 5 वा. घडली. केरी किनाऱ्याजवळच्या डोंगरावरून पॅराग्लायडिंगमधून पायलट एका महिला पर्यटकाला घेऊन विहार करताना पायलटचा उतरताना अंदाच चुकला व डोंगराच्या कपारीत पॅराग्लायडिंग कोसळले. यामध्ये दोघांचाही बळी गेला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी शिवानी दाभळे (26) या पुण्यातील पर्यटक युवतीने आकाशात विहार करण्यासाठी पॅराग्लायडिंग भाड्याने घेतले. तिला सुमन नेपाळी (25) याने पायलट म्हणून सोबत केली होती. केरी डोंगरावरून नेहमीप्रमाणे उड्डाण केले होते. मात्र उतरताना त्यांच्या ग्लायडिंगची दोरी तुटली असावी व दरीत कोसळले असावे, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सदर पॅराग्लायडिंग शेखर नामक व्यक्तीच्या मालकीचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविले आहेत. मांद्रे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल पोळेकर अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, त्या दरीतून दोघांचे मृतदेह वर काढण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्या दरीत उतरणे व पुन्हा वर येणे बरेच अवघड असून तितकेच जीवघेणे असल्याचे स्थानिक यशवंत केरकर यांनी सांगितले.
जीवघेण्या पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्याची मागणी
गोव्यात डोंगर पठारावर कित्येक पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी येतात. यापूर्वी काहींनी जीव गमावला तर अनेकजण जायबंदी होण्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेमुळे जीवघेण्या पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्याच्या मागणीला जोर आला आहे. या पॅराग्लायडिंगच्याविरोधात स्थानिकांनी आतापर्यंत अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा मोटरच्या आवाजाने ऊग्णांना बराच त्रास होतो. यापूर्वी अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकारी निलंबित केले होते. हा धोकादायक पॅराग्लायडिंगचा प्रकार कायमचा बंद करण्याची मागणी यशवंत केरकर यांनी केली आहे.
केरी पंचायतीचा ठराव केराच्या टोपलीत !
केरी पंचायतीने मागच्या काही महिन्यांपूर्वी केरी समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करण्यास मनाई करणारा ठराव करून तो संबंधित खात्याकडे पाठविला होता. मात्र सदर ठरावाला सध्या केराची टोपली दाखविली. स्थानिकांचा विरोध होता तसेच पंचायतीने तसा ठराव केला असतानाही सरकारने पॅराग्लायडिंग व्यावसायिकांना परवाने का दिले गेले?, असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
...तर संबंधितांवर कडक कारवाई करा : आमदार जीत आरोलकर
आमदार जीत आरोलकर यांच्याशी संपर्क साधला असता किनारी भागात पॅराग्लायडिंग करण्यास आपला विरोध असून पर्यटक खात्याला तसेच पर्यटन मंत्र्यांना आपण तसे कळवले होते. शिवाय केरी पंचायतीलाही आपण सूचना केल्यानुसार केरी पंचायतीने हा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून पॅराग्लायडिंगवर निर्बंध घालण्याचा ठराव मंजूर केला. कोस्टल पोलिसांनाही याविषयी सूचना केल्या होत्या. आज जी घटना घडलेली आहे त्या संबंधित व्यावसायिकांनी परवाने घेतले नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी केली आहे.