सांकवाळच्या भीषण अपघातात दोन ठार
स्विफ्टवरील चालकाचा ताबा गेल्याने अपघात : स्विफ्टमधील दोघांचा बळी, अन्य एक जखमी
वास्को : सांकवाळच्या महामार्गावर स्विफ्ट कार व अर्टिगा कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले. हे दोघेही स्विफ्ट कारमध्ये होते. अर्टिगा कारचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरेश जग्गल (नवेवाडे वास्को, 45) व निस्सार अहम्मद (बेंगळूर, 54) अशी मयतांची नावे आहेत. जखमी अर्टिगा कारचालकाचे नाव यल्लाप्पा मुनिस्वामी (30) असे असून तो गौरावाडा कळंगुट येथील राहणारा आहे. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा अपघात सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील सांकवाळच्या शिला बार अॅण्ड रेस्टारंटजवळ घडला. स्विफ्ट कारने (जीए-07-सी 7406 ) चुकीच्या दिशेने येऊन अर्टिगा कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मयत सुरेश जग्गल हा स्विफ्ट कारमधून कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने येत होता. अर्टिगा कार (जीए-03-एन 4056) वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने जात होती. सांकवाळच्या शिला बारजवळ स्विफ्ट चालकाचा कारवरील ताबा गेला. त्यामुळे त्याची कार चुकीच्या दिशेने गेली व समोरून येणाऱ्या अर्टिगा कारला धडकली. या अपघातात सुरेश याला जागीच मृत्यू आला. निस्सार याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. या अपघात प्रकरणी वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.