बिदरमध्ये दरोडेखोरांच्या गोळीबारात दोघे ठार
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला : 93 लाखाची रोकड लंपास
बेंगळूर : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या सीएमएस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर भीषण गोळीबार करून दरोडेखोरांनी 93 लाख रुपये लंपास केले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडणारी ही घटना बिदर शहरात गुरुवारी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे. बिदरमधील शिवाजी महाराज चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी सीएमएस एजन्सीचे कर्मचारी वाहन घेऊन आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन मास्कधारी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर रिव्हॉल्वरमधून 8 गोळ्या झाडल्या. वाहनातील 93 लाख रुपये असणारी पेटी घेऊन दुचाकीवरून पलायन केले. यावेळी घटनास्थळी असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दरोडेखोरांवर दगडफेक करून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
गोळीबाराच्या घटनेत एक कर्मचारी जागीच तर अन्य एका जखमीचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गिरी वेंकटेश व शिवकुमार अशी मृतांची नावे आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवकुमारला तातडीने बिदर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. गिरी वेंकटेश हा एटीएममध्ये पैसे भरणारा सीएमएस एजन्सीचा कर्मचारी होता. तर शिवकुमार हा सुरक्षा कर्मचारी असल्याचे समजते. हल्ल्याची माहिती मिळताच बिदर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिदरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख चंद्रकांत पुजारी यांनी देखील भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरोडेखोरांना अटक करण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली. एसबीआयच्या एटीएम केंद्रातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनेचे दृश्य काही जणांनी मोबाईलवर चित्रित केले असून ते व्हायरल झाले आहे.
मंत्री ईश्वर खंड्रे यांच्याकडून पोलिसांना सूचना
बिदरमधील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमजवळ दरोडेखोरांनी केलेल्या हल्ला प्रकरणाचा मंत्री ईश्वर खंड्रे यांनी निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरांचा त्वरित शोध घेण्याची सूचना त्यांनी पोलिसांना दिली आहे. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. गृहमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली असून बिदर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांशीही चर्चा केली आहे. शुक्रवारी मी बिदरला येणार असून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार असल्याचे मंत्री ईश्वर खंड्रे यांनी सांगितले.