For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन काश्मिरी मुलांना उत्तराखंडमध्ये मारहाण

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन काश्मिरी मुलांना उत्तराखंडमध्ये मारहाण
Advertisement

ओमर अब्दुल्ला यांची मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/देहराडून

उत्तराखंडमध्ये जातीय वादाचा एक प्रकार समोर आला आहे. देहराडूनमध्ये  दोन काश्मिरी अल्पवयीन मुलांना त्यांची नावे आणि पत्ते विचारल्यानंतर मारहाण करण्यात आली. दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रोव्हिजन स्टोअर मालक संजय यादव आणि आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संजयला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणाबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे समजते. उत्तराखंडमध्ये मारहाण करण्यात आलेली दोन्ही मुले काश्मीरमधील रहिवासी आहेत.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ते विकासनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका दुकानात चिप्सची पॅकेट खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यांची भाषा आणि पोशाख पाहून जवळ बसलेल्या काही इतर तरुणांनी त्यांची चौकशी सुरू केली. किशोरवयीन मुलांनी काश्मीरचे रहिवासी असल्याचे उघड करताच स्थानिक तरुणांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यांना बेदम मारहाण केली. स्थानिकांच्या हल्ल्यात ही मुले गंभीर जखमी झाली आहेत. हल्ल्यानंतर, काश्मिरी तरुणांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला देहराडून येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेत एका काश्मिरी तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दोघांना अटक, गुन्हाही नेंद

तक्रारदारांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे देहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले. आयपीसीच्या कलम 117(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा करत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. पुष्करसिंह धामी यांनी एफआयआर दाखल करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच जम्मू काश्मीरमधील रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असेही स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.