इराणच्या सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायाधीशांची हत्या
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या सर्वोच्च न्यायालयात शनिवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला. हे दोन्ही न्यायाधीश राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि हेरगिरीशी संबंधित खटल्यांची सुनावणी करत होते. दोघांनाही गोळ्या घातल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वरही गोळीबार केला. या संपूर्ण घटनेत आणखी एक न्यायाधीश जखमी झाले आहेत. याशिवाय एका अंगरक्षकालाही दुखापत झाली आहे. हल्ल्यामागील हेतू अद्याप कळू शकलेला नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोर हा न्याय विभागाचा कर्मचारी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
इराणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:45 वाजता हा हल्ला झाला. यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना लक्ष्य करण्यात आले. मारल्या गेलेल्या न्यायाधीशांची नावे अली रजनी आणि मोगीसेह अशी आहेत. ते इराणी न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ न्यायाधीश होते. या दोन्ही न्यायाधीशांनी यापूर्वीच्या अनेक खटल्यांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांना ‘हँगमन’ असेही संबोधले जात होते. त्यांच्यावरील हल्ल्याचा हेतू शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी 1988 मध्ये रजनी यांच्या हत्येचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यादरम्यान, त्यांच्या दुचाकीमध्ये चुंबकीय बॉम्ब ठेवण्यात आला होता.