तिलारीनजीक प्रशिक्षणावेळी दोन जवानांचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
तिलारी नदी प्रकल्पातील बॅकवॉटरमध्ये रिव्हर क्रॉसिंग ट्रेनिंगच्यावेळी बोट उलटून दोन जवानांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी शनिवारी ही घटना घडली असून सायंकाळी दोन्ही जवानांचे पार्थिव बेळगावला आणल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार तिलारी येथे कमांडोचे खडतर प्रशिक्षण सुरु आहे. तिलारीच्या बॅकवॉटरमध्ये रिव्हर क्रॉसिंग ट्रेनिंगच्यावेळी एका बोटीतून सहा जवान पलिकडच्या किनाऱ्यावर जात असताना अवघ्या 50 मी. अंतरावरच बोट उलटली. त्यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी दोघांचेही पार्थिव बेळगावला आणले असून रात्री कॅम्प पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. मात्र, घटनास्थळ चंदगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे चंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
हुतात्मा झालेले जवान राजस्थान व पश्चिम बंगालमधील आहेत. विजयकुमार दिनवाल (वय 28, राजस्थान), दिवाकर रॉय (वय 26, पश्चिम बंगाल) अशी या जवानांची नावे आहेत. या घटनेची माहिती चंदगड पोलीस स्थानकात नाईक सुभेदार पेपाराम चौधरी यांनी दिली आहे.