महांतेशनगरात चेन स्नॅचिंगच्या दोन घटनांनी खळबळ
वरदमहालक्ष्मी पूजेसाठी जाताना दागिने लंपास
बेळगाव : वरदमहालक्ष्मी पूजेचे आयोजन केलेल्या ठिकाणी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी महांतेशनगर परिसरात मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना शुक्रवारी दुपारी घडल्या. एकाच परिसरात या दोन घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या भामट्यांनी पोलिसांसमोर जणू आव्हानच उभे केले आहे. याबाबत माहिती अशी, सुमा महादेव मत्तिकल्ली (रा. थर्ड क्रॉस शाहूनगर, लास्ट बसस्टॉप) या वरदमहालक्ष्मी पूजेसाठी नातेवाईकांकडे जात होत्या. त्यावेळी महांतेशनगर येथील मेडप्लस मेडिकल दुकानसमोर दुपारी 3.50 च्या वेळेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यावेळी घाबरलेल्या सुमा यांनी आरडाओरड केली. मात्र मोटारसायकलवरून आलेल्या त्या भामट्यांनी पलायन केले.
या घटनेनंतर याच परिसरात फर्स्ट गेट टिळकवाडी येथील कमलदीप वेंकटेश शिलवंत या महांतेशनगर येथे वरदमहालक्ष्मी पूजेसाठी जात होत्या. त्यावेळी महांतेशनगर येथील विशाल मार्टसमोर सायंकाळी 4 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यामुळे कमलदीप यांनाही धक्का बसला. त्यांनी ही घटना इतरांना सांगितली. मात्र तोपर्यंत मोटारसायकलवरून आलेले भामटे वेगाने निघून गेले. महांतेशनगर परिसरातच या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटना केवळ 15 मिनिटांत घडल्याने एकाच टोळक्याचे हे कृत्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर माळमारुती पोलिसांना याची माहिती देण्यात आली. संपूर्ण माहिती महिलांकडून पोलिसांनी घेतली. त्यानंतर या परिसरात शोधाशोध केली. मात्र भामटे त्यांच्या हाताला लागले नाहीत. श्रावणमास असल्याने सणांना सुरुवात झाली आहे. अशावेळी पुन्हा सराईत टोळी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही घटनांची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात झाली आहे.