दोन जीएसटी अधिकारी लाचप्रकरणी अटकेत
अहमदाबादमध्ये कारवाई : 1.25 लाख ऊपयांची लाच मागितल्याचा ठपका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गुजरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुऊवारी अहमदाबादमध्ये लाचखोरीच्या आरोपाखाली दोन केंद्रीय जीएसटी अधिकारी आणि एका मध्यस्थाला अटक केली. ऑडिट अधीक्षक रिजवान शेख, सीजीएसटी निरीक्षक कुलदीप कुशवाह अशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर भौमिक सोनी असे मध्यस्थाचे नाव आहे. ऑडिट अधीक्षक रिजवान शेख यांनी अलीकडेच एका बुलियन टेडिंग फर्मच्या मालकाला जुलै 2017 ते मार्च 2023 या कालावधीतील त्याच्या खात्यांचे ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावली होती. यानंतर इन्स्पेक्टर कुशवाह यांनी त्यांच्या फर्ममध्ये जाऊन ऑडिटसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले. कागदपत्रे तपासल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाला खात्यातील अनियमिततेसाठी 35 लाखांचा दंड भरावा लागेल, असे सांगितले. यानंतर दंड कमी करण्यासाठी व्यावसायिकाकडून 1.25 लाख ऊपयांची लाच मागितली. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.