Miraj Crime News | मिरजमध्ये दोन गटात कोयता-तलवारीने तुंबळ राडा; सहा जखमी
सुभाषनगर टाकळी येथे रस्त्याच्या वादातून हिंसक झटापट
मिरज -मिरज तालुक्यातील सुभाषनगर टाकळी हद्द हुळळे प्लॉट येथे रस्त्यावरुन जाण्याच्या कारणातून दोन गटात कोयता, कुडाडी व तलवारीने तुंबळ राडा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दोन्ही गटाचे जमाव समोरासमोर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
यावेळी एका जमावाने दुसऱ्या गटातील तरुणाच्या घरावर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली. यात दोन्ही गटातील सहा जखमी झाले. याबाबत रावसाहेब लक्ष्मण लोखंडे आणि मोहसीन बाबु फनिबंद यांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, विशिष्ट समाजाच्या दोन गटातील झालेल्या या राडेबाजीनंतर सुभाषनगरसह परिसरात तणाव झाला. कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये व जातीय तणाव वाढीव लागू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. विशेष करून
सुभाषनगरमध्ये तगडा बंदोबस्त वहिवाटीच्या रस्त्यावरुन येण्या-जाण्याच्या वादातून विशिष्ट समाजाच्या दोन गटात सशस्त्र राडा झाल्याने सुभाषनगर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिस प्रशासनही सतर्क झाले. शनिवारी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर सुभाषनगर, डुळळे प्लॉट आणि ११ नं. गल्लीत तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला. रस्त्यावर जमाव करणाऱ्यांना पांगविले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली.सुभाषनगर, डुळ्ळे प्लॉट, गल्ली नं. ११ येथे पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली.
रावसाहेब लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते व त्यांचे मित्र थांबले होते. याचवेळी संशयीत मोहसीन बाबु फनिबंद हे चालत जात होते. यावेळी लोखंडे हे फोनवरुन मित्राला वैरण घेऊन ये, असे सांगत असताना संशयीत मोहसीन यांनी गैरसमज करुन घेतला. रस्त्यावरुन येण्या-जाण्याचा वाद करत मोहसीन यांनी लोखंडे यांच्याशी भांडण काढले.
शिवीगाळ करून पळून जात होते. यावेळी लोखंडे यांनी मोहसीन यांना थांबविण्यासाठी पाठलाग केल्यानंतर संशयीत मोहसीन यांनी जमावाला बोलाविले. यावेळी मोहसीन फनिबंदसह संशयीत रफिक नानावटी, महेबुब शेख, बंदेनवाज शेख, उमर शेख, सोहेल शेख, सय्यद शेख, खजा शेख, अब्दूल शेख, बंडू, शबीरससह इतर अनोळखींनी लोखंडे यांना मारहाण केली. त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्तींनाही मारहाण केली. लोखंडे यांच्या घरावर व चारचाकी वाहनांवर
दगडफेक केली. लोखंडे यांच्यासह कुटुंबिय जखमी झाले.
मोहसीन यांच्या तक्रारीनुसार, ते पायी चालत जात असताना संशयीत रावसाहेब यांनी येण्या-जाण्यातून टोला मारला. याचा जाब विचारल्यानंतर संशयीत रावसाहेब लोखंडेसह दादासाहेब कुल्हाळ, शोभा लोखंडे, बाळू लोखंडे, अनिल लोखंडे व इतर साथीदारांनी मारहाण केली. या मारहाणीत मोहसीन फनिबंद हे जखमी झाले आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी घेऊन दोन्ही गटाच्या २५ हून अधिक संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यासमोरही राडा
सुभाषनगर येथे राडेबाजीनंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही गट मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आले होते. रात्री तक्रार घेण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारातच पुन्हा दोन गट एकमेकांना भिडले. तेथेही हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगविले. यावेळी काही संशयीतांची धरपकडकडी करण्यात आली.