लोणावळ्dयात भीषण अपघातात गोव्याचे दोघे ठार
कार-टेम्पो यांच्यात धडक : म्हापसा येथून 14 युवक गेले होते पर्यटनाला
वार्ताहर / लोणावळा
लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे शनिवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान कार व टेम्पो यांच्याच झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो चालक देखील जखमी झाला आहे. दर्शन शंकर सुतार (वय 21) व मयुर वेंगुर्लेकर (वय 24, दोघेही राहणार म्हापसा, गोवा) अशी या अपघातात मयत झालेल्या तरुणाची नावे आहेत. तर टेम्पो चालक भीमा विटेकर (वय 60, राहणार वाकसई, मावळ) हे जखमी झाले आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जलसा रिसॉर्ट येथून लायन्सपॉईंटकडे भरधाव वेगात निघालेली कार क्रमांक ((GA 03 AM 0885) समोरून येणारा टेम्पो क्रमांक (MH 14 JL 5525) ला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन्ही तरुण जागीच ठार आहे.
म्हापसा-गोवा येथून लोणावळ्याला 14 तरुण तीन कारमधून फिरायला आले होते. गुरुवारी हे सर्वजण लोणावळ्यात आले होते. घुसळखांब येथील एका हॉटेलमध्ये हे तरुण मुक्कामी होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योगेश सुतार व मयुर वेंगुर्लेकर हे दोघेजण स्विफ्ट कारमधून लायन्स पॉईंट येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले व जेमतेम दीड किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे त्यांच्यासोबत असलेले इतर मित्र देखील घाबरले आहेत. गोवा येथून आलेले हे सर्वजण गोव्यात टॅक्सी चालवतात. लोणावळ्यात ते फिरायला आले होते. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.