पार्टीसाठी बोलावून पाच जणांच्या टोळक्याकडून दोघा मित्रांना मारहाण
बेळगाव : पार्टी करण्यासाठी बोलावून पाच जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बिअर बाटलीने डोक्यात हल्ला करण्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उत्सव क्रॉस उद्यमबाग येथील एका बारमध्ये घडली आहे. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बाबू दोडमनी रा. जयनगर मच्छे, संतोष गोविंद दिवटगी रा. उद्यमबाग, सुनील गोविंद दिवटगी रा. उद्यमबाग, बबलू बेपारी रा. हुंचेनहट्टी आणि सागर अडव्याप्पा मुलीमनी रा. बेळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर बाळकृष्ण सुरेश काल्लेरी रा. कबलापूर ता. बेळगाव आणि रुद्रेश मल्लाप्पा तलवार रा. पिरनवाडी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी बाळकृष्ण, रुद्रेश आणि पहिला आरोपी योगेश हे तिघेही मित्र आहेत.
आरोपी योगेश याने बाळकृष्णला मारहाण करण्याच्या उद्देशाने पार्टी देतो असे सांगून शनिवार दि. 4 रोजी उत्सव क्रॉस येथील एका बारमध्ये बोलावून घेतले. आरोपी योगेशसोबत त्याचे वरील चौघे मित्रही त्या ठिकाणी पार्टीसाठी आले होते. पार्टी सुरू असताना फिर्यादी बाळकृष्ण याचा मित्र विक्रम नायक त्याला भेटण्यासाठी तेथे आला होता. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान विक्रम बारमध्ये आला असताना आरोपी संतोष आणि सुनील यांनी विक्रमला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी बाळकृष्ण भांडण सोडविण्यासाठी गेला असताना आरोपी संतोष आणि सुनील याने तुझे जास्त झाले आहे, तू आम्हाला सोडून इतरांसोबत फिरतोस, आज तुला ठार मारतो, असे म्हणत पाच जणांनी बाळकृष्णला हाताने मारहाण केली. तर आरोपी संतोषने पाण्याचा जग, आरोपी बबलू याने बिअरच्या बाटलीने त्याच्या डोक्यात हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या रुद्रेशलाही आरोपी संतोष आणि बबलू यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक डी. के. पाटील पुढील तपास करीत आहेत.