रत्नागिरीत भर दिवसा दोन फ्लॅट फोडले
रत्नागिरी :
शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ परिसरातील स्टेट बँकेशेजारील शकुंतला अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी खळबळ उडवून दिली. या घरफोडीत हजारोचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. ही घटना गुऊवारी सकाळी 9.30 ते 11 वाजण्याच्या मुदतीत घडल्याने तेथील रहिवाशांना धक्का बसला. पोलीस यंत्रणेचीही धावाधाव उडाली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांकडून घरफोड्या करण्याचे सत्र सुरू आहे. पण गुऊवारी सकाळी दिवसाढवळ्या झालेली चोरी परिसरात सर्वांच्या सतर्कतेचा विषय बनली. स्टेट बँके शेजारीच शकुंतला अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर सागर साळवी, सुनिता चव्हाण यांचे फ्लॅट आहेत. गुऊवारी सकाळी साळवी कुटुंबिय हे काही कामानिमित्त घर कुलूपबंद करून बाहेर गेलेले होते. तर त्यांच्या शेजारी असलेला सुनिता चव्हाण यांचाही फ्लॅट कुलूपबंद होता. या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर इंदुलकर कुटुंबिय राहतात. त्यांना पहिल्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या दरवाजाची कडी उचकटलेली आणि त्याला कुलूपबंद असलेले दिसले. तर दुसऱ्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आल्याने काहीतरी गडबड असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराची खबर इंदुलकर कुटुंबियांनी तत्काळ साळवी कुटुंबियांना दिली. लागोलाग शहर पोलिसांना खबर देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश माईणकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलिसांची टिम, ठसेतज्ञ, श्वान पथकानेही धाव घेतली.
- दिवसा चोरीमुळे चोरट्यांची घाईगडबड?
पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता, अज्ञात चोरट्याने बंद घरात घुसून आतील कपाटे लोखंडी हत्याराने फोडून आतील ऐवज, सामान अस्ताव्यस्त करून टाकलेले होते. पहिला फ्लॅट सागर सुनील साळवी यांचा असून चोरट्यांनी त्यांच्या घरातील बेडरुममधील कपाटे फोडली होती. त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि काही रोकड चोरून नेली असल्याचे सांगण्यात आले. तर साळवी यांच्या फ्लॅटच्या शेजारील सुनीता चव्हाण यांच्या घरातील बेडरूममधील कपाटे चोरट्यांनी फोडली. आतील सामान अस्ताव्यस्त करून टाकलेले होते. त्या घरातून समई, निरंजन आणि वाटीसारख्या पितळी वस्तू चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्याने घाईगडबडीत हाताला जेवढा ऐवज लागला तेवढाच नेल्याची बाब पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आली. या घरफोडीत अंदाजे दहा हजाराची रोकड चोरून नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- पोलिसांसमोर आव्हान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी फ्लॅटच्या बंद दरवाजाला कोणत्या तरी हत्याराने धक्का देऊन दरवाजाची कडी व कुलूपे तोडली आहेत. पोलिसांनी दोन्ही फ्लॅटमधील चोरीला गेलेल्या ऐवजाची खातरजमा व पंचनामा केला. चोरीच्या ठिकाणी चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळवण्यासाठी ठसे तज्ञांचे पथक गुंतले होते. तर पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली. मात्र चोरट्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. पोलिसांनी अपार्टमेंट आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
..