Kolhapur : कागलमध्ये दोन फ्लॅट फोडले, 17 तोळे सोने लंपास !
कागल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
कागल : कागल शहरात भर दुपारी दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल १३ लाख ५२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हल्ला मारला. ही घटना कागल पेट्रोल स्टोअर्सच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी हाईट्स या निवासी इमारतीत शुक्रवारी दुपारी सव्वा तीन ते चारच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी अवघ्या ४० मिनिटांत दोन फ्लॅट्स साफ केले.
बालाजी हाईट्सच्या तिसऱ्या मजल्यावर रावसाहेब भास्कर देशमुख आणि संतोष अरुण कोगनोळीकर यांचे फ्लॅट आहेत. शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास देशमुख दाम्पत्य फ्लॅट बंद करून पत्नीसह काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे कोगनोळीकर सुद्धा कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान संधी साधून चोरट्यांनी दोन्ही बंद फ्लॅट्स फोडून चोरी केली.
चोरट्यांनी देशमुख यांच्या फ्लॅटमधील कपाट उघडून सोन्याचे पेंडल, नेकलेस, राणीहार, मणीमंगळसूत्र, कानातील टॉप्स असे १४८ ग्रॅम वजनाचे व ११ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. तर संतोष कोगनोळीकर यांच्या फ्लॅटमधून सोन्याची चेन, दोन अंगठ्या आणि कानातील टॉप्स असे २१ ग्रॅम वजनाचे व १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. चोरीनंतर संध्याकाळी घरी परतल्यावर फ्लॅटमधील कपाटे उघडी व सामान अस्ताव्यस्त दिसल्याने देशमुख दाम्पत्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.