तीन बसेसच्या धडकेत दोन महिला प्रवासी ठार
75 हून अधिक जखमी : 10 जणांची प्रकृती गंभीर
बेंगळूर : तीन केएसआरटीसी बसेसच्या धडकेत दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झाला तर 75 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मंड्या जिल्ह्याच्या मळवळ्ळी तालुक्मयातील बाचनहळ्ळीजवळ रविवारी ही घटना घडली. जखमी प्रवाशांपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना म्हैसूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, केएसआरटीसीच्या एका बसचा टायर फुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या बसला जोराची धडक दिली. दरम्यान, मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने टायर फुटलेल्या बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. पहिल्यांदा दोन बसमध्ये समोरासमोर टक्कर झाली. अपघातानंतर उभ्या असलेल्या बसला मागून आलेली दुसरी बस धडकली. परिणामी, बसमधील प्रवासी जखमी झाले. 10 प्रवासी गंभीर जखमी झाले तर 65 हून अधिक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने मळवळ्ळी तालुका रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना म्हैसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंड्या येथील ऊग्णालयात दाखल झालेल्या दोन महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ही घटना मळवळ्ळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.