Sangli Crime | बेडगेत दोघा शेतकऱ्यांना 11 लाखांचा गंडा
मिरज ग्रामीण पोलिसांकडे ओमासे बंधूंची फसवणूक तक्रार
मिरज -मिरज तालुक्यातील बेडग येथील दोघा द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांकडून १८ लाख, ६८ हजारांचे द्राक्ष घेऊन एका व्यापाऱ्याने पैसे न देता ११ लाख, २८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत दिपक शंकर ओमासे (वय ४५) व शशिकांत शंकर ओमासे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संशयित व्यापारी धनाजी गौतम धायगुडे (रा. मोडनिंब ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.दिपक ओमासे व शशिकांत ओमासे हे बेडगेतील द्राक्षबागयतदार शेतकरी आहेत. त्यांनी शेतात पिकवलेली द्राक्ष व्यापारी धनाजी धायगुडे याला विक्री केली होती.
संशयित धायगुडे याने स्वतः बेडगेत येऊन संबंधीत शेतकऱ्यांकडून १८ लाख, ६८ हजार, ७५२ रुपयांची द्राक्ष घेतली. बदल्यात आजतागायत सात लाख, ४० हजार रुपये दिले. मात्र उर्वरीत ११ लाख, २८ हजार, ७५२ रुपये अद्याप दिले नाहीत. संबंधीत शेतकऱ्यांनी संशयित व्यापाऱ्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आमासे बंधूंनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे.
ओमासे बंधू यांनी सबंधित घटनेची माहिती पोलिसात दिल्यावर पोलिसांकडून व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.