परिते येथे गव्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी
गव्याने पोटात शिंग खुपसल्याने युवक गंभीर
कोल्हापूरः (भोगावती)
परिते ते म्हाळुंगे ता करवीर रस्त्यावरील लकडे यांच्या मालकीच्या शेताजवळ रविवारी दुपारी गव्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले. यामध्ये प्रतिराज गणेश लकडे पाटील (वय२०) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.तर साताप्पा कोकाटे (वय ५०) यांना गव्याने घोळसल्याने त्यांना मुक्का मार लागला आहे.त्यांच्यावर कोल्हापुरात सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,प्रतिराज लकडे पाटील व साताप्पा कोकाटे हे परिते म्हाळुंगे रस्त्यावरील पाटील नाळवा भागातील आपल्या शेताकडे कामानिमित्त गेले होते.त्यावेळी कोथळी, बेले व म्हाळुंगे गावांच्या दिशेने आलेल्या चार गव्यांच्या कळपातील एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.यामुळे लकडे पाटील यांच्या कमरे जवळ शिंग खुपसल्याने मोठी जखम झाली आहे.यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर कोकाटे यांना गव्याने घोळसल्याने त्यांना मुक्का मार लागला आहे.त्यांच्यावर गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
परिते गावच्या पाटील नाळवा परिसरामध्ये रविवारी चार गवे फिरताना निदर्शनास आले आहेत.गव्यांनी अचानक केलेल्या दोघांवरील हल्ल्यामुळे व चार गव्यांच्या वावरा मुळे शेतकरी वर्गामधून भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत परिते गावच्या पोलिस पाटील सौ पुजा रणजित पाटील यांनी वनखात्याला व करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.