कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू

01:11 PM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथील घटना 

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम असलेल्या सुलेगाळी येथील गणपती सातेरी गुरव यांच्या शेतातील झटका करंटवर (आयबेक्स) लोंबकळणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोन हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. विद्युत धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू होण्याची तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरगाळी वनविभागाचे अधिकारी, हेस्कॉमचे अधिकारी, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक तसेच वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

सुलेगाळी येथील शेतकरी गणपती  गुरव यांनी वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी शासनमान्य झटका करंट (आयबेक्स) तारेचे कुंपण शेताभोवती लावलेले आहे. अशा पद्धतीचे झटका करंट दुर्गम भागातील आणि जंगल भागातील शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावतात. तालुक्यातील नागरगाळी वनविभागातील परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वीपासून दांडेली वनविभागातील हत्तींचा कळप दाखल झाला आहे. गणपती गुरव यांच्या झटका करंट कुंपणावर लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने या झटका कंरटच्या कुंपणात विद्युत प्रवाह सक्रिय झाला होता. याचवेळी रविवारी पहाटे 3 वाजता दोन हत्ती गणपती गुरव यांच्या शेतात जाताना या झटका करंटचा धक्का लागल्याने दोन हत्तींचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी वनअधिकारी दाखल 

सकाळी शेताकडे पाहणीसाठी गेल्यानंतर दोन हत्तींचा मृत्यू झाल्याचे पाहून गणपती गुरव यांनी गावात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वनखाते आणि हेस्कॉम तसेच पोलिसांना गावकऱ्यांनी माहिती दिली. घटनास्थळी नागरगाळी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी शिवानंद मगदूम आणि वनाधिकारी सचिन व्हनमनी, उपवनाधिकारी केदार तेननगी आणि कर्मचारी  दाखल झाले. त्यानंतर हेस्कॉमचे अधिकारीही दाखल झाले. संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आल्याची माहिती शिवानंद मगदूम यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. हेस्कॉमचे अभियंते भरतेश नागनूर, नागेश देवलत्तकर, व्ही. एम. चकडीमठ यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनीही याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हेस्कॉमचे इलेक्ट्रीक इन्स्पेक्टर हे घटनास्थळी सोमवारी भेट देऊन सखोल चौकशीनंतर आपला अहवाल देणार आहेत. त्यानंतरच पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे हेस्कॉमच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. सायंकाळी उशिरा वनविभागाचे सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीएफओ एन. ए. क्रांती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासणीसंदर्भात वनाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

सखोल चौकशीनंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेणार 

वनाधिकारी शिवानंद मगदूम यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, मृत्यू झालेले दोन हत्ती हे पाच वर्षे वयाचे आहेत. तसेच एक नर आणि एक मादी हत्ती आहे. हत्तींच्या मृत्यूबाबत हेस्कॉमच्या अहवालानंतरच क्रम घेण्यात येणार आहे. सोमवारी चौकशीनंतर मृत हत्तींचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. झटका करंटमधून मुख्य वाहिनीचा विद्युतप्रवाह प्रवाहित झाला की, शेतकऱ्यांने आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी घरच्या विद्युत प्रवाहातून झटका करंटमध्ये विद्युतप्रवाह प्रवाहित केला आहे का, याचे स्पष्टीकरण हेस्कॉमच्या इलेक्ट्रीक इन्स्पेक्टरांच्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. तसेच हत्तींचा मृत्यू हा विद्युतप्रवाहामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे झाल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप

दोन हत्तींचा मृत्यू हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरोप हलगा ग्रा. पं. सदस्य रणजीत पाटील यांनी केला. ते म्हणाले, सुलेगाळी येथून पुढे विद्युतपुरवठ्यासाठी हेस्कॉमची मुख्यवाहिनी गेली आहे. यातील काही वाहिन्या खाली आल्या आहेत. तसेच काहींनी विद्युतपुरवठा चोऊन घेतला आहे. अशा परिस्थितीत गुरव यांच्या शेताजवळील विद्युतप्रवाह असलेली वाहिनी तुटून लोंबकळत होती. ती वाऱ्याच्या झोतामुळे झटका करंटच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विद्युतप्रवाह प्रवाहित झाल्यामुळे हत्तींचा मृत्यू झाला आहे. वनखात्याने गुरव यांना जबाबदार धरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जंगली प्राणी आणि हत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी वनखात्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हत्तींचा कळप सक्रिय झाला असताना वनखात्याने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article