For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नानोडा परिसरात दोन घटनांमध्ये दोघे बुडाले

12:25 PM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
नानोडा परिसरात दोन घटनांमध्ये दोघे बुडाले
Advertisement

भटवाडी येथे सेल्फीच्या नादात एकटा बुडाला : उसप येथे कालव्यात वाहून गेला दुसरा युवक,अग्निशामक, पोलिसांकडून रात्रीपर्यंत शोध

Advertisement

डिचोली : लाटंबार्से पंचायत क्षेत्रात भटवाडी नानोडा येथे चिरेखणीत एक युवक सेल्फी घेण्याच्या नादात आपल्या साथीदारांसह पडल्याने बुडाला असून अन्य दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. दुसऱ्या एका घटनेत उसप येथे कालव्यात उतरलेला युवक वाहून गेल्याने बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. डिचोली अग्निशामक दलाकडून रात्रीपर्यंत सदर युवकाचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. सध्या वाढत चाललेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांचे गट पाण्याने भरलेल्या चिरेखणी, तलाव, नद्या, झरी, कालवे या ठिकाणी आंघोळ व मौजमजा करण्यासाठी जातात. परंतु पाण्याच्या खोलीचा, तसेच वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या घटना घडतात.

सेल्फी काढण्याचा नाद जीवावर बेतला

Advertisement

भटवाडी नानोडा येथील चिरेखणीत सांतइनेज-पणजी येथील युवकांचा गट आंघोळीसाठी गेला होता. दुपारी आंघोळ व मौजमजा करीत असतानाच या तीन जणांच्या गटाला सेल्फी काढण्याचा मोह निर्माण झाला. चिरेखणीच्या काठावर उभे राहून सेल्फी काढत असताना मागे असलेल्या चिरेखणीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात कोसळले. यात मोहित कश्यप (वय 17 वर्षे) हा खोल पाण्यात बुडाला.

स्थानिकांनी दोघांना वाचविले

याच चिरेखणीवर तसेच परिसरात असलेल्या स्थानिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी  मोहित कश्यप याच्या समवेत असलेल्या दोघांना वाचविण्यात यश मिळवले. परंतु मोहित हा खोल पाण्यात गेल्याने तो स्थानिक बचावकर्त्यांच्या हाती लागू शकला नाही. त्यामुळे तो बुडाला. अग्निशामक दलाने या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढला. मोहित याला डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी उपनिरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करीत आहे.

उसप येथे युवक कालव्यात वाहून गेला

भटवाडी नानोडा येथे दुपारी युवक बुडण्याची घटना ताजी असतानाच उसप नानोडा येथे काडसिद्धेश्वर स्वामींच्या मठाजवळच तिळारी कालव्यात मौजमजेसाठी आलेला दाडाचीवाडी धारगळ येथील दीप दत्ताराम बागकर (वय 16 वर्षे) हा युवक वाहून गेल्याची घटना घडली. रात्रीपर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. उपलब्ध माहितीनुसार धारगळ येथून चार-पाच जणांचा गट उसप नानोडा येथून वाहणाऱ्या तिळारी कालव्याजवळ आला होता. या युवकांचा कालव्याच्या पाण्यात आंघोळ करण्याचा बेत असावा, म्हणूनच दीप बागकर हा युवक हातात काठी घेऊन कालव्याच्या पाण्यात बुडवत असतानाच तो घसरून पाण्यात पडला अन् वाहू लागला. त्याला पकडण्यासाठी कोणताही आधार न मिळाल्याने तो वाहत गेला. मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी धडपड केली. सुमारे 100 मीटरपर्यंत त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हाती लागू शकला नाही व पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला.

 रात्रीपर्यंत लागला नाही शोध

या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाचे जवान व डिचोली पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खास बोटीच्या सहाय्याने दीप याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. या कामात स्थानिक लोकांनीही त्यांना मदत केली. पोलिसांनीही आपल्या पद्धतीने शोध मोहीम हाती घेतली. परंतु रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. या दोन्ही घटनांमुळे लाटंबार्से पंचायतक्षेत्रात तसेच डिचोलीत खळबळ माजली. पाणी भरून राहणाऱ्या किंवा पाणी वाहणारी अशी अनेक असुरक्षित ठिकाणे डिचोली तालुक्मयातही आहेत. परंतु जीवाचे धाडस करून अनेकजण या ठिकाणांवर आंघोळीसाठी येतात आणि पाण्याच्या खोलीचा, किंवा वेगाचा अंदाज न आल्याने अशा घटना घडतात.

धबधबे, नद्या, चिरेखणींवर जाण्यास बंदी

पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना घडल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असून गोव्यातील धबधबे, तळी, नद्या, चिरेखाणीतील पाण्यात आंघोळ करण्यास तसेच पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश जारी केला आहे. मामलेदार, पोलीस आणि इतरांना या प्रकरणी लक्ष देण्याची सूचना आदेशातून केली आहे. या आदेशाची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेशातून बजावले आहे. डिचोली तालुक्यात पाण्यात बुडाल्याने मृत्यूच्या दोन घटना घडल्यानंतर सरकारने हा बंदीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.