इडली-डोसा सेंटरवरील कारवाईत दोन घरगुती सिलिंडर जप्त
अन्न-नागरी पुरवठा खात्याची फुलबाग गल्लीत कारवाई
बेळगाव : शहरातील काही हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडर्सचा वापर केला जात आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला मिळाली आहे. त्यामुळे विविध हॉटेल्सना भेटी देऊन अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. फुलबाग गल्ली येथील एका इडली डोसा सेंटरवर कारवाई करून दोन घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करून सदर प्रकरण प्रांताधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहे. शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा वापर करण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. व्यावसायिक सिलिंडरपेक्षा घरगुती सिलिंडर कमी किमतीत मिळतो. त्यामुळेच अनेक जण घरगुती सिलिंडर वापरण्यास पसंती देत आहेत.
पण हा प्रकार बेकायदेशीर आहे. याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला समजल्याने अधिकाऱ्यांकडून हॉटेलची पाहणी केली जात आहे. फुलबाग गल्ली येथील एका इडली डोसा सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथे व्यावसायिक ऐवजी घरगुती सिलिंडर असल्याचे आढळून आले. त्यामुळे डोसा सेंटर मालकाला अधिकाऱ्यांनी फैलावर घेतले. दोन्ही सिलिंडर जप्त करण्यासह त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध माहितीनुसार केवळ एकाच ठिकाणी ही कारवाई केली असली तरी शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल्समध्ये घरगुतीच सिलिंडरचा वापर केला जातो. त्यामुळे ही मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या माध्यमातून चांगले उत्पन्न सरकारला मिळते. मात्र, घरगुती सिलिंडरचा वापर व्यावसायिक कामासाठी होत असल्याने ही बाब अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे.