For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nashik News | विहिरीत पडल्या, दोन दिवस पाईप अन् दोरी घट्ट धरून ठेवल्या; चांदवडच्या आजींची 'मृत्यूच्या दाढेतून' सुटका!

07:02 PM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
nashik news   विहिरीत पडल्या  दोन दिवस पाईप अन् दोरी घट्ट धरून ठेवल्या  चांदवडच्या आजींची  मृत्यूच्या दाढेतून  सुटका
Advertisement

नाशिक -नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका वृद्ध महिलेने मृत्यूशी मोठी झुंज दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले. २९ ऑगस्टपासून हरवल्या असलेल्या आजी बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्या होत्या. पूर्ण दोन दिवस अन्न-पाण्याशिवाय काळोख्या विहिरीत अडकूनही त्यांनी जीव वाचवला. दोन दिवस मोटारीच्या पाईपला आणि दोरीला घट्ट धरून ठेवले होते.

Advertisement

चांदवडच्या फुले नगर येथे राहणाऱ्या चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या ७५ वर्षांच्या आजीबाई मुलाकडे जाण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटून देखील त्या काही घरी पोहचल्या नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटूंबियांनी त्यांचा शोध घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र सगळीकडे शोध घेऊनही त्या काही सापडल्या नाहीत. दरम्यान, देव धावून यावा तसा गणेश पारवे हा तरुण याठिकाणी जणू आजीसाठी धावून आला. एसटी बस स्थानकाच्या विहिरी जवळून जात असताना त्याला आजीचा आवाज ऐकू आला अन् त्याने डोकावून पाहिले तर त्याला एक महिला पाण्याच्या पाईपला असलेल्या दोरीला पकडून असल्याचे दिसले.

अन् नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला
त्याने तातडीने इतर नागरिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चंद्रभागा आजींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, आजीला बाहेर काढून शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले असून आजीची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.