दोन दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक
सेन्सेक्सची 575 अंकांवर उसळी : आशियातील बाजारांचा सकारात्मक प्रभाव
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला. यासह, बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट यामुळे बाजार वधारला. रिअॅल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीनेही बाजाराला आधार दिला.
बीएसई सेन्सेक्स 82,197.25 वर उघडला. अंतिम क्षणी सेन्सेक्स 575.45 अंकांच्या वाढीसह 82,605.43 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला अखेरच्या क्षणी निफ्टी 178.05 अंकांच्या वाढीसह तो 25,323.55 वर बंद झाला.
रिअॅलिटी क्षेत्राने चांगली कामगिरी केली. व्याजदर चक्रातील मंदी आणि आकर्षक मूल्यांकनामुळे हे घडले. त्याचवेळी, सकारात्मक जागतिक संकेतांनी आयटी आणि धातू क्षेत्रांनाही बळ दिले.
या कंपन्या तेजीत
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, एल अँड डी, अल्ट्राटेक सिमेंट आणि इटर्नल (झोमॅटो) हे सर्वाधिक तेजीत राहिले होते तर इन्फोसिस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा हे घसरणाऱ्या समभागांमध्ये राहिले.
क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी रिअॅलिटी 3.04 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह सर्वाधिक नफा मिळवणारा होता. त्यानंतर, निफ्टी पीएसयू बँक 1.67 टक्के आणि निफ्टी मेटल 1 टक्क्यांनी वाढले. विस्तृत बाजारपेठांमध्येही तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 1.11 टक्के आणि स्मॉलकॅप 100 0.82 टक्क्यांनी वाढले. व्यापक बाजारपेठांमध्ये, निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 1.11 टक्के आणि 0.82 टक्क्यांनी वाढून बंद झाले.
जागतिक बाजारात
बुधवारी आशियाई बाजारपेठांमध्ये तेजी दिसून आली. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.3 टक्के वाढला. ऑस्ट्रेलियाचा एस अॅण्ड पी/एएसएक्स 200 निर्देशांक 0.93 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.8 टक्के वधारला. अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा सुरू झाल्यामुळे आशियाई बाजारपेठेत ही वाढ झाली आहे. खरं तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध ‘कठोर कारवाई’ करण्याची धमकी दिली आहे आणि स्वयंपाकाच्या तेलावर बंदी घालण्याचीही घोषणा केली आहे.