तुळसणीमध्ये हौदात आढळले दोन बछडे
देवरुख :
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडी येथे हौद्यात बिबट्याचे 2 बछडे सापडल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या बछड्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या वतीने हौद्यामध्ये पिंजरा सोडण्यात आला. तीन तासाच्या मेहनतीनंतर बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी गाव वसलेला आहे. तुळसणी सुर्वेवाडी येथे भाऊ गीते यांची आंबा काजुची बाग आहे. या बागेत पाण्यासाठी हौद उभारण्यात आला आहे. बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बागेत काम करणाऱ्या कामगारांना हौदातून आवाज आला. कामगाराने हौद्यामध्ये पाहणी केली असता, बिबट्याचे दोन बछडे निदर्शनास आले. ही महिती गावकऱ्यांना मिळताच बछडे पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.
वनविभागाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. वनपाल तौफीक मुल्ला व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हौद्यामध्ये पिंजरा सोडण्यात आला. तीन तासाच्या मेहनतीननंतर बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. याकामी वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. हे बछडे सात ते आठ महिने वाढीचे आहेत. पशुधन वैद्यकीय अधिकारी हे बछड्यांची तपासणी करणार आहेत. यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली आहे.