अडीच तासात एकाच कारला दोन वाहनांची ठोकर; दुसऱ्या अपघातानंतर कार जळून खाक
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड येथे शनिवारी अडीच तासात एकाच कारचे दोन अपघात झाले. पहाटे ट्रेलरने दिलेल्या धडकेनंतर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या कारला सकाळी पुन्हा स्कॉर्पिओने धडक दिली. सलग दुसऱ्या धडकेनंतर काही वेळातच कारने पेट घेतला अन् ती खाक झाली. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये जीवितहानी झाली नाही.
सिकंदरकुमार किशोर साव (२३, विरार पूर्व-जि. पालघर) हा ऑरा कार (एमएच ४८ डीक्यू ३५५७) घेऊन १८ सप्टेंबर रोजी रात्री विक्रोळी येथून कणकवलीकडे भाडे घेऊन निघाला होता. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तो वाकेड येथे आला असता त्याच्या कारला मागून येणाऱ्या एका ट्रेलरने घडक दिली. या धडकेमुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने सिकंदर साव तसेच कारमधील कुटुंबियांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर अपघातग्रस्त कार महामार्गावर संरक्षक भिंतीजवळ उभी करण्यात आली होती.
अपघातग्ग्रस्त कार गॅरेजमध्ये नेण्यासाठी क्रेनची प्रतीक्षा सुरू असतानाच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच ४७ बीटी ८००६) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर स्कॉर्पिओ काही अंतरावर जाऊन थांबली. तर स्कॉर्पिओच्या धडकेनंतर काही वेळातच ऑरा कारने अचानक पेट घेतला आणि कार आगीत खाक झाली. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.
अपघातातील स्कॉर्पिओ चालक नीरज मायाशंकर यादव (२५, मूळ उत्तरप्रदेश सध्या रा. मालाड पूर्व-मुंबई) हा प्रीती शैलेश निषाद व त्यांचे पती शैलेश निषाद यांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. या घटनेत ऑरा कारचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी लांजा पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती. दोन्ही अपघातावेळी लांजा पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर, हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर, विलास जाधव, कॉन्स्टेबल स्वप्निल कदम, उमाजी बजागे, किरण डोर्लेकर यांच्यासह वाकेड ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते नंदू सुर्वे आणि जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ यांनी घटनास्थळी तत्परतेने मदतकार्य केले.