कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Lote MIDC Fire: लोटेत एकाच दिवशी 2 कंपन्यांमध्ये भीषण आग, एकजण ठार

10:38 AM May 19, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

या घटनेने कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

Advertisement

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अॅक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास झालेल्या रिअॅक्टर स्फोटात दिलीप दत्तात्रय निचिते (47) या जखमी कामगाराचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. अन्य एक कामगार गंभीररित्या जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेने कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

Advertisement

लोटे एमआयडीसीतील कंपन्या वायूगळती आणि प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सांडपाणी उघड्यावर सोडण्याच्या वाढत्या घटनांनी देखील पंचक्रोशीतील ग्रामस्थ हतबल झाले आहेत. त्यात स्फोटांचे सत्र सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडील अॅक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अचानक रिअॅक्टरचा स्फोट होऊन धुराचे लोट पसरले.

स्फोटानंतर धुराचे लोट पाहून कंपनीतील अन्य कामगार सैरावैरा पळू लागले. कारखान्यात ऊग्णवाहिका नसल्याने जखमी कामगारांना उपचारार्थ ऊग्णालयात हलवण्यासाठी दुचाकीचा वापर करण्याची नामुष्की ओढवली. दोन्ही जखमी कामगारांना ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही कामगाराची प्रकृती गंभीर होती. यातील दिलीप नचिते या कामगारावर उपचार सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड व सहकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

लासा कंपनीत जीवितहानी टळली, कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लासा सुपर जेनेरिक्स रासायनिक कंपनीत रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेने जीवितहानी टळली असली तरी कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्नितांडवानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही.

लासा कंपनीत रविवारी सुट्टीमुळे मोजकेच कामगार होते. कंपनीला भीषण आग लागल्याचे कामगारांच्या निदर्शनास येतात सर्व कामगार तातडीने बाहेर पळाले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे माहिती मिळताच औद्योगिक विकास महामंडळाचे दोन अग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कंपनीत आगडोंब उसळल्यानंतर चिपळूण परिषदेचा अग्निशामक बंबही तातडीने तैनात करण्यात आला.

तीन अग्निशामक बंबांच्या सहाय्याने कंपनीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात सहभाग नोंदवला. दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाली आहे.

आगीचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड घटनास्थळी पोहोचले. आगीचे नेमके कारण शोधण्यात पोलीस यंत्रणा गुंतली आहे. लोटे एमआयडीसी रविवारी एकाच दिवशी दोन कंपन्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटासह आगीच्या दुर्घटना घडत असतानाही कंपन्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांचा अभाव असल्याचा सूर ग्रामस्थांकडून आळवला जात आहे. कंपन्या कामगारांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचा आरोपही केला जात आहे.

Advertisement
Tags :
#crime news#khed_news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaemployee deadkokan newsLote MIDCLote MIDC Fire
Next Article