मणिपूरमध्ये बॉम्ब हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू
आई जखमी : घटनेच्या विरोधात निदर्शने : पोलीस चौकीची तोडफोड : दोन ऑइल टँकर्स पेटविले
वृत्तसंस्था/ विष्णुपूर
मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात मोइरांग ट्रोंगलाओबी भागात काही उग्रवाद्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. या बॉम्बच्या स्फोटात 5 वर्षीय मुलगा आणि 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटामुळे घरात दोन्ही मुले आणि त्यांची आई बेडरुममध्ये झोपले होते. या घटनेत मुलांची आई जखमी झाली आहे.
या घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनी मंगळवारी सकाळी निदर्शने केली आहेत. या दरम्यान जमावाने एका पेट्रोल पंपानजीक दोन ऑइल टँकर आणि एका ट्रकला पेटवून दिले. तसेच मोइरांग पोलीस स्थानकासमोर टायर जाळले आणि एका पोलीस चौकीत तोडफोड केली आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तसेच राज्यातील 5 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी मंगळवारी सकाळी पीडित महिलेची रुग्णालयात जात भेट घेतली. बॉम्ब फेकणाऱ्या उग्रवाद्यांची ओळख पटविली जाईल आणि कायद्यांतर्गत त्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. हा हल्ला म्हणजे क्रूर कृत्य असून मानवतेवर थेट हल्ला आहे. मणिपूरमध्ये अथक प्रयत्नांनी प्रस्थापित होणाऱ्या शांततेला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा खेमचंद यांनी केला आहे.
पर्वतीय भागात वसलेले मोइरांग
मणिपूरचा मोइरांग ट्रोंगलाओबी भाग चुराचांदपूरच्या पर्वतीय भागांनजीक आहे. 2023 आणि 2024 मध्ये मैतेई आणि कुकी-जो समुदायांमध्ये वांशिक संघर्षादरम्यान येथे सातत्याने गोळीबार झाला होता. ट्रोंगलाओबीनजीक एक विस्फोटक उपकरणही मंगळवारी हस्तगत करण्यात आले आहे. स्थानिक आमदार शांति सिंह यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. हे घृणास्पद कृत्य दहशतवादापेक्षा कमी नाही. अशाप्रकारच्या अमानवीय कृत्यांना आमच्या समाजात कुठलेच स्थान नाही आणि याची कठोर निंदा केली जावी असे आमदाराने म्हटले आहे.